दामदुप्पटच्या नावाखाली फसवणुकीची शक्यता; आडगावकर सराफ परिसरात गुंतवणूकदारांची गर्दी

नाशिक | प्रतिनिधी 

शहरातील प्रसिद्ध आडगावकर सराफ प्रा. लि.ने हजारो ग्राहकांची दामदुप्पटच्या नावाखाली फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज सकाळी कॅनडा कॉर्नर येथील दुकानाच्या आवारात गुंतवणूकदरांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे परिसरातील वाहतूकदेखील विस्कळीत झाली होती. याच वेळी हा प्रकार उघडकीस आला.

अधिक माहिती अशी की, नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील आडगावकर सराफ येथे गुंतवणूकदारांची मोठी गर्दी दिसून आली.  गुंतवणूक केलेले पैसे, दागिने परत मिळत नसल्यामुळे गुंतवणूकदारांचा संताप होत होता.

घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीसही घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. ज्वेलरी शॉपजवळ मोठा गोंधळ झाल्यामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झालेली बघायला मिळाली.

मेत्रेय, माऊली, केबीसी सारख्या मोठ्या अपहाराच्या घटनेनंतर शहरात दामदुप्पट योजनेच्या नावाखाली आणखी एक फसवणुकीचा प्रकार समोर येण्याची शक्यता  वर्तविण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार जवळपास एक हजार ते बाराशे गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.  या घटनेतून कोट्यवधी रुपयांची फसवणूक समोर येण्याची शक्यता आहे.