रमजानपर्यंत कोरोना संपविण्याचा संकल्प; बाधीत क्षेत्रांना अन्न धान्याचा तुटवडा भासू देणार नाही

रमजानपर्यंत कोरोना संपविण्याचा संकल्प; बाधीत क्षेत्रांना अन्न धान्याचा तुटवडा भासू देणार नाही

मालेगाव : ‘कोरोना’ सारख्या महामारीने संपुर्ण जगासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. केंद्र व राज्य शासनामार्फत तातडीने उपाययोजना करण्यात आल्यामुळे यावर मात करण्यात आपण मोठ्याप्रमाणात यश संपादन केले आहे. प्रशासनामार्फत युध्दपातळीवर काम सुरू असून त्याला नागरिकांचा प्रतिसादही तितकाच गरजेचा असल्याचे सांगत, कोरोना बाधीत क्षेत्रांना अन्न धान्याचा तुटवडा भासू देणार नाही असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री ना.छगन भुजबळ आज म्हणाले.

मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात ‘कोरोना’च्या उपाययोजनांचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल, महापौर ताहेरा शेख, विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक छोरींग दोर्जे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलिस अधिक्षक (ग्रामीण) आरती सिंग, सहायक जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकीत्सक दिलीप जगदाळे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त नितीन कापडणीस, अपर पोलिस अधिक्षक संदिप घुगे, प्रातांधिकारी विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर डांगे, आरोग्य अधिकारी डॉ.सपना ठाकरे, माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

येणाऱ्या रमजान पर्यंत मालेगाव शहरातून ‘कोरोना’ विषाणूला हद्दपार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करतांना पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण मंदीर, मशिदीतील धार्मिक विधी थांबविले आहेत. त्याच प्रमाणे सामाजिक प्रथा ज्यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर संचार होतो तो थांबविला पाहिजे.

यासाठी स्थानिक लोकप्रतिनीधींनी पुढाकार घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर प्रशासनामार्फत प्रत्येक व्यक्तीचा करण्यात येणाऱ्या सर्व्हेला गैरसमजामुळे अपेक्षीत प्रतिसाद मिळत नाही ही खेदाची बाब आहे. यासाठी स्थानिक आमदार, महापौर, नगरसेवकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या स्वयंसेवकांची यादी व स्वयंसेवक प्रशासनास उपलब्ध करून द्यावेत.

मालेगाव शहरातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा चिंताजनक असून याचे वेळीच गांभिर्य ओळखून नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन तपासण्या करून घ्याव्यात. आपल्या जिवापेक्षा बहूमुल्य असे काहीच नाही अशी भावनीक साद घालत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com