फडणवीसांनी नागपूरला झुकते माप देत इतरांवर अन्याय केला – अजित पवार
स्थानिक बातम्या

फडणवीसांनी नागपूरला झुकते माप देत इतरांवर अन्याय केला – अजित पवार

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

जिल्हा नियोजन समितीचा आराखडा तयार करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरला झुकते माप देत २३७ कोटी जादा दिले होते. इतर जिल्ह्यांच्या निधीत कपात करून नागपूरला जादा निधी देण्यात आला होता.

मात्र, अर्थमंत्री म्हणून मी कदापि असा अन्याय करणार नाही. राज्याला डोळ्यासमोर ठेवून काम करायचे असते असे सांगत फडणवीस यांनी राज्यावर अन्याय केल्याचा घणाघात अर्थमंत्री अजित पवार यांनी केला.

विभागाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधला. नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी नियोजनात नागपूरवर टीका केली होती याबाबत विचारले असता त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

राज्यात लवकरच ७० हजार जागांची भरती होणार असून त्यात प्राधान्य पोलीस खात्याला दिले जाणार आहे. पोलिसांच्या ८ हजार जागा भरल्या जातील. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते गरजेचे असल्याचे पवार म्हणाले. तसेच, ग्रामसेवक, आरोग्य, महसूल व इतर अत्यावश्यक सेवामध्ये भरतीला प्राधान्यक्रम दिला जाईल.

राज्यातील शाळा व अंगणवाडी खोल्यांची अवस्था अतिशय बिकट आहे त्यामुळे आमदारांना त्यांच्या विकासनिधीतील २० टक्के रक्कम अंगणवाड्या व शाळा खोल्या बांधणे व दुरुस्त करण्यासाठी  खर्च करणे बंधनकारक असणार आहे.

मी विकासाच्या चाहता

मांजर पाड्याचे काम सुरु आहे ते पाणी नाशिक व मराठवाड्याकडे वळवता येईल जेणेकरून तेथील दुष्काळ कायमस्वरूपी वळवता येईल याबाबत आढावा बैठकीत नाशिक व नगरच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनीदेखील लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासित केले आहे. मीदेखील विकासाचा चाहता आहे असे यावेळी अजित पवार म्हणाले.

Deshdoot
www.deshdoot.com