Exclusive Interview : स्वतःसोबतच मालेगावही करोनामुक्त करणार; सकाळी ५० सूर्यनमस्कार घातले – मनपा आयुक्त

Exclusive Interview : स्वतःसोबतच मालेगावही करोनामुक्त करणार; सकाळी ५० सूर्यनमस्कार घातले – मनपा आयुक्त

मालेगाव | हेमंत शुक्ला

करोना पॉझिटिव्ह असलो तरी कुठलाही त्रास मला जाणवत नाही. मी स्वतः करोना मुक्त होईलच, शिवाय मालेगाव शहरातून देखील करोनास हद्दपार करेल असा आपल्याला ठाम विश्वास आहे. या युद्धभुमी वरून आपण कुठल्याही परिस्थितीत पळ काढणार नाही अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मनपा आयुक्त दीपक कासार यांनी ‘दैनिक देशदूत’शी बोलताना व्यक्त केली.

करोना उपचार केंद्रांना सुविधांची पाहणी करण्यासाठी सातत्याने दिलेल्या भेटी. बाधित रुग्णांशी यावेळी झालेला संवाद. तसेच लक्षणे दिसत असलेल्या संशयितांनी सराव तपासणीसाठी पुढे यावे यास्तव बडी मालेगाव हायस्कूल सह ठिकाणी नागरिकांशी संवाद साधत प्रबोधनाचे काम करत होतो. कदाचित यातूनच संक्रमण होऊन आपला अहवाल पॉझिटिव आल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती आयुक्त कासारे म्हणाले.

करोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने होम काँरन्टाईन असलो तरी आपले कामकाज नेहमीप्रमाणे सुरू आहे. सकाळी अधिकाऱ्यांशी संवाद साधत उपचार केंद्रातील सुविधा पूर्तीचे काम थांबणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आपण दिले आहेत.

स्वच्छता तसेच जंतुनाशक फवारणीचा आढावादेखील घेतला. अतिदक्षता कक्षामध्ये ऑक्सीजन व व्हेंटिलेटर सुविधा लवकरात लवकर उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून कामाचा वेग देण्याच्या सूचना आपण केल्या आहेत. अधिकारी सेवक सक्रीय झाले आहेत. त्यामुळे चांगले टीम वर्क उभे केल्याचे आपणास समाधान आहे असे आयुक्त कासारे यांनी सांगितले.

पॉझिटिव्ह असलो तरी शरीरात कुठलीही लक्षणे व त्रास होत नसल्याने भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. रात्री शांत झोप लागली सकाळी सहा वाजता उठल्यावर दम लागतो का? श्वास घेण्यास त्रास होतो का? हे बघण्यासाठी आपण पन्नास सूर्यनमस्कार घातले. इतर व्यायाम व प्राणायाम केला. परंतु दम लागला नाही व श्वास घेण्यासही ही त्रास झाला नाही.

त्यामुळे औषधोपचार व व्यायामच्या सहाय्याने आपण लवकरच करोना मुक्त होउन मालेगाव करांच्या सेवेत दाखल होऊ याबद्दल मनात कुठलीही शंका नसल्याचे आयुक्त कासार म्हणाले.

करोना बाधित व संशयित रुग्णांची गैरसोय होऊ नये यास्तव उपचार केंद्र स्वतः भेट देऊन पाहात होतो. म्हाळदे केंद्रात देखील प्रत्येक कक्षाची पाहणी केली याठिकाणी सुविधा होत्या. परंतु केंद्र शहराबाहेर असल्याने वेगळे वाटते अशी तक्रार रुग्णांनी केल्याने आपण मसगा महाविद्यालयात पूर्ण सुविधा देत कक्ष सुरू करत येथील सर्व रुग्ण दाखल केले.

तसेच जीवन व फरान रुग्णालयाच्या तक्रारी आल्याने तेथेदेखील पीपीई किट घालून जात रुग्णांना भेटून त्यांच्या तक्रारींचे निरसन केले होते. जीवन हॉस्पिटल नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. ते लवकरच शहराच्या सेवेत दाखल होईल. त्रास होत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

तज्ञ डॉक्टर व परिचारिका यांची नियुक्ती शासनातर्फे करण्यात येत आहे. शहरातील मसगा, जीवन, फारान, हज हाऊस, सहारा, व दीलावर हाँल याठिकाणी सर्व सुविधायुक्त उपचार केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. आपण होम काँरन्टाईन असलो तरी या कामावर लक्ष ठेवून असल्याचे आयुक्त कासारे यांनी सांगितले

बारा केंद्रांवर अधिकारी नियुक्त

करोना बाधित व संशयित रुग्णांवर 12 केंद्रांची निर्मिती करत तेथे उपचार केले जात आहेत. या केंद्रांवरील सुविधांवर लक्ष ठेवण्यास तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी अभियंता दर्जाचे 12 अधिकारी आपण नियुक्त केले आहे. या केंद्रातील सर्व अडचणी दूर करण्याची जबाबदारी या केंद्रप्रमुख अभियंत्यांची राहणार आहे. त्यामुळे केंद्रांवरील रुग्णांच्या तक्रारीचे प्रमाण आगामी काळात निश्चित कमी झालेले दिसेल असा विश्वास आयुक्त कासार यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com