मालेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द – कृषी मंत्री दादाजी भुसे
स्थानिक बातम्या

मालेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द – कृषी मंत्री दादाजी भुसे

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

मालेगाव | प्रतिनिधी

मालेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द आहोत. त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील. येत्या मे महिन्यापर्यंत शहरातील विविध मुख्य रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

मंत्री श्री. भुसे यांच्या प्रयत्नातून व संकल्पनेतून आणि नगरविकास कार्यक्रम येाजेतून मंजूर 26 लाख 66 हजार रुपयांच्या विशेष निधीतून मालेगाव शहरातील श्रीरामनगर भागात बांधण्यात आलेल्या वैकुंठधामचा लोकार्पण सोहळा मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते आज सकाळी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मालेगाव शहराचे उपमहापौर नीलेश आहेर, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, नगरसेवक सखाराम घोडके, राजाराम जाधव, मदन गायकवाड, जयप्रकाश बच्छाव, नारायण शिंदे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, मालेगाव शहराच्या विकासासाठी दूरदृष्टिकोन ठेवून प्रयत्न केले जातील. आगामी काळात शहरातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पूर्णत्वास येईल. नागरिकांनीही सकारात्मक विचार करीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे. मालेगाव शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या मोसम नदी विकास आराखडा मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

तसेच शहर विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यातून होणारी कामे आगामी काळात पूर्णत्वास येतील, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

मालेगाव बाजार समितीचे माजी सभापती बंडूकाका बच्छाव, सुरेश निकम, शशिकांत निकम यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश गंगावणे व संजय दुसाने यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रमिकांचा सत्कार

या स्मशानभूमीचे बांधकाम करणाऱ्या दत्ताजी मोरे यांच्यासह श्रमिकांचा मंत्री श्री. भुसे यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. याशिवाय वास्तूविशारद बाजीराव भामरे, अभियंता भूषण मानकर आदींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com