सिन्नर तालुक्यात ‘निसर्ग’चा तडाखा; उन्हाळी मका बाजरी भुईसपाट; वीजपुरवठा खंडित
स्थानिक बातम्या

सिन्नर तालुक्यात ‘निसर्ग’चा तडाखा; उन्हाळी मका बाजरी भुईसपाट; वीजपुरवठा खंडित

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात काल रात्री निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. तालुक्यातील तळवाडी भागात वडांगळी हायस्कूल समोर
विजेच्या तारा तुटल्याने रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला आहे. मध्यरात्री अडीच तीन पर्यंत वादळाचा कहर सुरूच होता. पाऊसही सुरू होता. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. सिन्नर शहरात रात्रभर वीजपुरवठा खंडित होता.

तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. शेतातील पिके वादळाने आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरात लोंढे गल्लीत झाड घरावर पडल्याने गोळेसर कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतात काढून ठेवलेल्या कांदा पिकाबरोबर शेतात उभ्या असलेल्या उन्हाळी मका व बाजरीची पिके भुईसपाट झाली आहेत. झाडे, पोल उन्मळून पडली आहेत. अजूनही शेतात पाणी साचलेले आहे.

वादळाचा पश्चिम पट्ट्याला सर्वात मोठा तडाखा बसला असून ठाणंगाव येथे दीपक बैरागी यांच्या पॉली हाउसचे नुकसान झाले आहे. तसेच  लाल व पिवळी मिरचीचे नुकसान झाले आहे. दोन ते तीन झाडे व 3 इलेक्ट्रिक पोल पडले आहेत. महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

तालुक्यातील मनेगाव, डूबेरेवाडी येथे पाच वृक्ष उन्मळून पडली. तर एक विजेचा खांब वाकला आहे. तसेच वडगाव पिंगळा येथे 4 विजेचे पोल पडल्याने विजेची बत्ती गुल झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com