नाशिक : द्राक्ष निर्यातीला कोरोनाचा फटका; साडे तीन लाख मेट्रिक टन निर्यातक्षम द्राक्ष पडून
स्थानिक बातम्या

नाशिक : द्राक्ष निर्यातीला कोरोनाचा फटका; साडे तीन लाख मेट्रिक टन निर्यातक्षम द्राक्ष पडून

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

लासलगाव | वार्ताहर

कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. याचा फटका  द्राक्ष  निर्यातीवर झाला असून  देशाला आणि द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना मोठा आर्थिक तोटा यावर्षी सहन करावा लागणार आहे.

नाशिक जिल्हा द्राक्षाचे आगार आहे. निर्यातक्षम द्राक्षाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्हा व परिसरामध्ये अजूनही 60 हजार एकरच्या जवळपास द्राक्षबागा तयार असून साधारणतः साडेतीन ते चार लाख मेट्रिक टन द्राक्ष अजूनही पडून आहेत. कोरोना संकट असल्याकारणाने मजुरांअभावी द्राक्ष निर्यात पूर्णतः कोलमडले असून निर्यातक्षम द्राक्ष 20 ते 22 रुपये प्रति किलोने विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. मात्र, इतके कमी दर असूनही द्राक्षाला ग्राहक नसल्याने शेतकऱ्यांना या द्राक्षाचे बेदाने करावे लागत आहे.

नाशिक जिल्ह्यातून 18 देशांमध्ये आत्तापर्यंत द्राक्षाची निर्यात करण्यात आलेली आहे .द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचा हंगाम संपण्यात आला असताना कोरोनाचा फटका बसला आहे.

देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने मजुर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे साडेतीन ते चार लाख मेट्रीक टन द्राक्षाचे पुढे काय करायचे असा प्रश्न उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.यंदाच्या हंगामा मध्ये नाशिक जिल्ह्यातून 83 हजार 500 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली असून मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 25 टक्क्याने घट झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील  द्राक्षे सातासमुद्रापार अनेक देशात दरवर्षी निर्यात होतात. परिसरातील शेतकरी प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटावर मात करून  गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन घेतात.

या वर्षी तर अवकाळी आणि अवेळी पाऊस त्यामुळे निर्माण झालेले खराब वातावरण अशा प्रचंड मेहनत घेत  शेतकर्यांनी  निर्यातक्षम  द्राक्ष बागा वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यातच कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने डोके वर काढल्याने त्याचा  द्राक्ष निर्यातीला मोठा  फटका बसतो आहे. मागील ४ एप्रिल  पर्यंत वर्षी जिल्ह्यातून १ लाख ९ हजार मॅट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली होती मात्र या कोरोना संकटामुळे यंदा द्राक्ष निर्यात रोडावली असून मोठ्या प्रमाणात द्राक्ष हे बागेतच पडून आहे.

परकीय चलनात घट

द्राक्ष हे देशाला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन २०१८-१९ हंगामात तब्बल २ लाख ४६ हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून २३३५ कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. या हंगामात द्राक्ष बागा परतीच्या आणि अवकाळी पाऊस,आणि कोरोना या संकटात सापडल्यामुळे  द्राक्ष निर्यातीत २५ टक्के घट झाल्याने याचा फटका देशाच्या परकीय चलनावर बसलेला आहे.

जगन्नाथ खापरे, अध्यक्ष द्राक्ष बागायतदार संघ

आधी राज्यात आणि नंतर देशभरात लॉक डाऊन करण्यात आले असून संचारबंदी लागु करण्यात आल्याने द्राक्षासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. द्राक्ष बागायतदारांकडे असलेले मजुर भीतीपोटी निघून गेले आहेत. द्राक्ष काढण्याबरोबरच पॅकेजींगसाठी देखील कामगार लागतात. मात्र, संचारबंदीमुळे पाच पेक्षा अधिक कामगार जमण्यास परवानगी नसल्याने त्याची देखील अडचण निर्माण झाली याचाच परिणाम द्राक्ष बागेला  बसला आहे.

देशाची द्राक्ष निर्यात

२०१५-१६ – १३२६४७ मेट्रिक टन – १३६२.२६ कोटी
२०१६-१७- १९८४७१ मेट्रिक टन – १७८१.७१ कोटी
२०१७-१८- १८८२२१ मेट्रिक टन – १९०० कोटी
२०१८-१९ – २४६१३३ मेट्रिक टन- २३३५ कोटी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com