नवीन नाशिक : संचारबंदी उल्लंघन प्रकरणी प्रभाग सभापती  दातीर यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा

नवीन नाशिक : संचारबंदी उल्लंघन प्रकरणी प्रभाग सभापती  दातीर यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा

नवीन नाशिक | प्रतिनिधी 

करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी उल्लंघन प्रकरणी नवीन नाशिक प्रभाग सभापती दीपक दातीर यांच्यासह त्यांच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अंबड पोलिसांनी ही कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यामुळे लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदारपणालाही लगाम बसला आहे.

नवीन नाशिक प्रभाग सभापती असलेले व प्रभाग २८ मधील नगरसेवक असलेले दीपक दातीर यांनी शासनाच्या संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवत त्यांच्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याला अनुसरून चौकशी करून ही कारवाई करण्यात आली.

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. घरातून बाहेर निघता येत नाही. रोजंदारी करणा-यांचा रोजगार बुडाल्याने आर्थिक संकट उभे आहे. अशा स्थितीत लोकप्रतिनिधींनी नागरिकांना धीर देणे, त्यांना मदत करणे गरजेचे असतांना नगरसेवक चारचाकी वाहनांमध्ये बिनधास्त फिरत व वेळ जाण्यासाठी क्रिकेट खेळताना दिसत आहेत.

त्यामुळे लोकप्रतिनिधींना सद्यस्थितीचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. सदर व्हिडिओ समोर आला असून त्यात दीपक दातीर हे त्यांच्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असताना दिसत आहे. हा व्हिडिओ एक युवतीने काढला असून असून तिने हिंमत दाखवीत याबाबत दातीर यांना जाब विचारला  असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

संचारबंदीत चारपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र जमू नये. सुरक्षित अंतर ठेवण्याचे नियम पाळावे. मास्क लावावा असे असताना दातीर यांनी सर्वच नियम धाब्यावर बसवित असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. याबाबत अंबड पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.

सर्वसामान्य नागरिकांवर तत्काळ कारवाई होते तशीच कारवाई अंबड पोलीसांनी लोकप्रतिनिधीवर केल्याने नागरिकांनी कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे. सभापती दातीर हे जबाबदार व्यक्ती असतानाही त्यांना परिस्थिती चे गांभीर्य नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओची शहानिशा करून या प्रकाराबाबत आम्ही तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. सभापती दीपक दातीर यांच्यासह १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापुढे न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

कुमार चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com