पावसाळ्याच्या आधी करोना हद्दपार करायचा आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पावसाळ्याच्या आधी करोना हद्दपार करायचा आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात पूर्णपणे करोनावर नियंत्रण आलेले नाही. कुठलाही निर्णय विचार करूनच घेणार आहे. म्हणूनच ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मला टीकेचा धनी व्हायचे नाही. राज्यातून पावसाळा सुरु होण्याच्या आधी करोना हद्दपार करायचा आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावे असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  

ते आज राज्याला संबोधित करत होते. राज्यात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा  सोशल मिडीयाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, लॉकडाऊन थोडाफार शिथिल करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषेत महाराष्ट्र आत्मनिर्भर करण्यासाठी आता ग्रीन झोनमधल्या लोकांनी पुढे यायला हवे. आतापर्यंत तुम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी घरात राहिलात सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन केले आणि करोनाशी लढा दिला. मात्र आता मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी ग्रीन झोनमधल्या माणसांनी पुढे यावे.

राज्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रोजगारासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी पुढे यावे. स्थानिकांना काम मिळण्यासाठी प्रयत्त्न केले जाणार आहेत.

सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन असला तरी आजपर्यंत 50 हजार उद्योग सुरू झाले असून 5 लाख मजूर आणि कामगार काम करू लागले आहेत. 70 हजार उद्योगांना परवानगी दिली असली तरी महापालिका क्षेत्रात निर्बंध अजूनही कडक आहेत. महापालिकांच्या व्यतिरिक्त इतर भागात उद्योग सुरू झाले आहेत.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल होणार असल्याचे संकेत त्यांनी आज दिले. याठिकाणी काळजी घेऊन व्यवहार सुरु होतील. पावसाळ्याच्या पूर्वी आपल्याला करोनाला हद्दपार करायचे आहे. आजवर खूप चांगली साथ राज्यातील जनतेने दिली आहे. ही साथ आणखी काही दिवस हवी आहे.

रेड झोनमध्ये अजूनही धोका आहे त्यामुळे तिथे फारशी शिथिलता देता येणार नाही. गतिरोधक म्हणून लॉक डाऊन काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत नागरिकांनी घरात थांबावे. शिथिलता मिळाली म्हणजे बाहेर पडून मुक्तपणे फिरणे योग्य नसल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com