Video : वडील शेतकरी आहेत, त्यांच्यामुळेच मी उच्चशिक्षण घेऊ शकले! भुईमुगाची पेरणी करत नववधूची ‘विदाई’

Video : वडील शेतकरी आहेत, त्यांच्यामुळेच मी उच्चशिक्षण घेऊ शकले! भुईमुगाची पेरणी करत नववधूची ‘विदाई’

मनमाड | बब्बू शेख 

आजवर ज्या बापाने काबाड कष्ट केले. ज्याच्यामुळे आपण उच्चशिक्षण घेऊ शकलो, आज विवाहसारखा आनंदाचा दिवस ज्याने गाळलेल्या घामाच्या थेंबांनी बघावयास मिळाला अशा बापाच्या इथून मुलगी जेव्हा सासरी जायला निघाली तेव्हा तिने शेतात भुईमुग पेरून मगच विदाई व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

या वधूने आपल्या पतीसोबत आधी शेतात भुईमुगाची पेरणी करत वडिलांच्या  आणि त्यांनी फुलवलेल्या शेतीच्या प्रती आदरभाव व्यक्त केला. मुलगी आणि वडील यांच्यासह शेतीशी असलेलं भावनिक नातं सांगणारी ही आगळी वेगळी घटना घडली नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कोकणखेडा येथे.

या नवंदाम्पत्याचे नाव आहे संदीप व करुणा एळीनजे. या दोघांचा लग्न चांदवडला पार पडले. आपण ज्या शेतात वडीलांच्या सोबत नेहमी यायचो. त्या शेतीशी आपलं आता कायमच नातं तुटणार आहे. हे पाहून नववधू करुणाने पती संदीपला सांगितले की, मला सासरी जाण्याअगोदर माहेरी असलेल्या वडिलांच्या शेतात शेवटची पेरणी करावयाची आहे.

पती संदीप ने पत्नीच्या इच्छाचा आदर करत तिच्या सोबत जाऊन शेतात भुईमुंगची पेरणी केली. आम्ही दोघे सुशिक्षित असून दोघांचे कुटुंबीय शेतकरी आहे त्यामुळे आम्ही पुढे ही शेतीच करणार असल्याचे या नवं दाम्पत्याने सांगत जय जवान जय किसान म्हणत शेती करण्याला प्राधान्य दिले.

मी शेतकरी असून माझ्या सुनेने शेतीला न विसरता लग्न होताच माहेरी शेतीत पेरणी केल्याचे पाहून मला खूप आनंद झाला असे संदीपचे वडील आणि करुणाचे सासरे बाळू एळीनजे यांनी सांगितले.

तर ज्या मातीत आपण वावरून मोठं झालं त्या मातीशी भावनिक नातं असतं त्यामुळे त्याला विसरता येत नाही हे करुणाने दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांची मुलगी असो किंवा मुलगा त्यांची शेतीशी नाळ कायम जुळलेली असते. मुलीची तर शेती सोबत त्यात शेतात राबराब राबणाऱ्या बापाशी वेगळं भावनिक नातं असतं. लग्न झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या शेतीशी कायमच नातं तुटणार असल्याचे पाहून  करुणा आणि संदीप यांनी केलेल्या कृतीची सर्वत्र चर्चा तर आहेच शिवाय सोशल मीडियातून उच्चशिक्षित असून शेतीला प्राधान्य देणाऱ्या या नवदाम्पत्याचे कौतुकदेखील केले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com