नाशिकमध्ये अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा १० ते ४ या वेळेतच सुरु राहणार
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा १० ते ४ या वेळेतच सुरु राहणार

Dinesh Sonawane

नाशिक | नाशिक जिल्ह्यात लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा प्रसंगी २४ तास चालू ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात आला होता. असा निर्णय ज्यावेळी घेण्यात आला त्यावेळी शहरात व जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता.

त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या पाठोपाठ जेव्हा शहरातही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तेव्हा सामाजिक तथा सामुहिक संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे भाग होते.

त्यात अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांची दुकाने यांच्या वेळा मर्यादित करणे आवश्यक होते. त्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी आपआपसात चर्चा, सल्लामसलत करून अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांची दुकाने व आस्थापना यांच्या वेळा निर्धारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक शहरातील काही रूग्णांना कोरोना चा झालेला संसर्ग व त्यापासून कोरोना चे होणारे सामुहिक, सामाजिक संक्रमण रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सी पाळण्याचे आदेश वेळोवेळी प्रशासनाने दिले होते. परंतु लोक त्याचे पालन करण्याऐवजी जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तुंच्या खरेदीच्या नावाखाली मॉर्निंग वॉक, सायंकाळी फिरणे व समुहाने जमू लागल्यावर कोरोना चा प्रादुर्भाव व सामुहिक संक्रमणाचा धोका अधिक वाढला असल्याचे जाणवले.

यामुळे वाढलेल्या गर्दीवर अंकुश मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व नाशिक शहर पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी संयुक्तपणे; आपआपसात चर्चा करून, अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांच्या वस्तु तसेच भाजीपाला विक्रेते दुकानदार यांची वेळ सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० अशी निश्चित केली आहे.

त्यानुसार नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी, संचारबंदीच्या काळात भाजीबाजार, अधिकृत मटन, चिकन व अंडी विक्रीची दुकाने सकाळी १०:०० ते दुपारी ० ४:०० या वेळेत सुरू राहतील अशा प्रकारचे आदेश नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी दिले आहेत.

तसेच नाशिक पोलिस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० या वेळेत अत्यावश्यक वस्तुंची विक्री करणाऱ्या आस्थापना सुरू राहतील, इतर वेळी सदरच्या आस्स्थापना पूर्णपणे बंद राहतील. यातून वैद्यकीय सेवा वगळण्यात आल्या आहेत तसेच दुग्ध पुरवठा सेवा साठी शिथिलता देण्यात आली आहे असे आदेश काढले आहेत.

एकंदरीत या सर्व आदेशांचा उद्देश सकाळी व संध्याकाळी अनावश्यक रीत्या फिरणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊनचे नियम पाळण्याकरता प्रवृत्त करणे हाच आहे.

या संदर्भात सर्व नागरिकांनी या आदेशांचे यथोचित पालन करणे आपल्या जिल्ह्यातील आतापर्यंतचे करोना व्यवस्थापन असेच प्रभावी राहण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नागरे-पाटील यांनी एका संयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Deshdoot
www.deshdoot.com