नाशिकमध्ये ५५० खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आरक्षणाच्या हालचाली; करोना रुग्णांच्या वाढलेल्या संख्येने वाढली चिंता
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये ५५० खाजगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा आरक्षणाच्या हालचाली; करोना रुग्णांच्या वाढलेल्या संख्येने वाढली चिंता

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

करोना रुग्णांना शासन दरानुसार बिल आकारण्याचे आदेश

नाशिक । प्रतिनिधी

राज्यातील करोना बाधीताचा वाढता आकडा आणि मुंबई व पुणे शहरातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने राज्यातील खाजगी रुग्णालयातील 80 टक्के रुग्ण शय्या आरक्षित करण्याचे आदेश काढले आहे. तसेच खाजगी रुग्णालयात दाखल होणार्‍या करोना रुग्णांना शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच बिल आकारणी करावीत असे आदेशही शासनाने जारी केले आहे. यानुसार नाशिक महापालिकेने शहरातील 550 रुग्णालये व सुश्रूषा गृहांना पत्र पाठवून गरज पडेल तेव्हा 80 टक्के खाटा आरक्षित ठेवण्याची तयारी ठेवण्याबाबत सांगितले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येत्या जुलै महिन्यात राज्यात करोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील करोना रुग्णांसदर्भातील स्थिती पाहत काही महत्वपुर्ण निर्णय घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई व पुण्यातील करोना बाधीतांचा वाढता आकडा लक्षात घेऊन खाजगी कार्यालये व मोकळ्या जागा आता रुग्णांसाठी वापरण्याची तयारी केली असुन मोकळ्या जागांवर रुग्णालये उभारण्याची तयारी केली आहे.

अशीच स्तिती राज्यातील इतर रेड झोनमधील जिल्ह्यात होऊ नये या करिता खाजगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे आदेश शासनाने काढले आहे.

तसेच करोना बाधीत रुग्णांना शासनाने ठरून दिलेल्या शासकिय दरानुसारच खाजगी रुग्णालयात बिल आकारणी केली जावीत. या शासनाच्या निर्देशानुसार महापालिका वैद्यकिंय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी शहरातील खाजगी रुग्णालये – सुश्रूषा गृहे यांना पत्र पाठवून यासंदर्भात तयारीच्या हालचाली सुरू केल्या आहे.

शहरात महापालिकेकडे नोंद झालेली सुमारे 550 खाजगी रुग्णालये व सुश्रूषा गृहे आहे. यांना महापालिकेने पत्र पाठवित आपल्याकडे असलेले एकुण खाटा आणि करोना बाधीतांसाठी किती खाटा आरक्षित करता येतील, यासंदर्भातील माहिती मागविली आहे. करोना बाधीत रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयात व्यवस्था करावयाची असल्यास स्वतंत्र खोली व दोन खाटातील अंतर यांसदर्भातील माहिती या माहितीत अंतर्भूत करण्यात आली आहे.

ही सर्व माहिती प्राप्त झाल्यानंतर महापालिकेकडुन करोना रुग्णांसाठी आरक्षित खाटांचे नियोजन केले जाणार असले तरी यांसंदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहे. तुर्त महापालिकेकडुन करोना बाधीत रुग्ण व अलगीकरण कक्ष यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात खाटा सज्ज ठेवण्यात आलेल्या असुन आता अद्यावत अशा बिटको रुग्णालयाचा वापर करण्याची तयारी महापालिका प्रशासनाकडुन सुरु झाली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com