नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ५१ करोना पाॅझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली ५७२ वर
स्थानिक बातम्या

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ५१ करोना पाॅझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली ५७२ वर

Dinesh Sonawane

मालेगावमध्ये २८,  नाशिक शहरात १८ तर ग्रामीणमध्ये ४ रुग्णांची भर

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात दिवसभरात ५१ रुग्ण करोनाबाधित सिद्ध झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील १८, मालेगाव शहरातील २८, नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यातील चौघांचा समावेश आहे. तर एक रुग्ण सोलापूर येथील असून त्याच्यावर नाशिक शहरात उपचार सुरु आहेत.

आज नाशिक शहरात आढळून आलेल्या १८ रुग्णांमध्ये ८ रुग्ण हे सातपूर कॉलनीतील आहेत. आधीच्या बाधित रुग्णाचे निकटवर्तीय असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शहरातील नवीन सिडको, पाटील नगर, श्रीकृष्ण नगर, हिरावाडी आणि मालपाणी सफ्रोन या परिसरातील रुग्णांचा समावेश आहे.  या रुग्णांमध्ये बाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीचा समावेश असल्याचे समजते. तर एका फार्मासिस्टचाही यात समावेश आहे. तसेच सायंकाळी प्राप्त अहवालात इंदिरानगर, धात्रक फाटा, तारवाला नगर आणि नाशिक शहरातीलच एका रुग्णाचा यात समावेश आहे.

मालेगावमध्ये आढळून आलेले २८ रुग्ण हे सोयगावसह इतर मालेगावमधील प्रतिबंधीत क्षेत्रातील रुग्ण आहेत. यासोबतच आज दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील एक रुग्ण आढळून आला आहे. तर विंचूरसह येथीलच सिद्धार्थ नगर येथील एक असे दोन रुग्ण निफाड तालुक्यातील आढळून आले आहेत. तर आज नव्याने चांदवड तालुक्यातही एक रुग्ण करोनाबाधित आढळला आहे. हा रुग्ण देवरगाव येथे आढळून आलेल्या बाधित रुग्णाचा नातलग असल्याचे वृत्त असून तो २७ वर्षांचा असल्याचे समजते.

आज जिल्ह्यात ५९३ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये  ५४२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह तर ५१ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आलेले आहेत.  शिवाय दोन बाधित रुग्णांची दुसरी तपासणीही बाधित आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील चिंता अधिकच वाढली आहे.

दोन वर्षीय सातपूरमधील तर मालेगावमधील दीड वर्षीय मुलीचा आज आलेल्या अहवालात समावेश आहे. तर एका ६ वर्षाच्या मुलाचाही अहवाल मालेगावी बाधित आढळून आला आहे. वाढलेल्या आकडेवारीमुळे नाशिक जिल्ह्याची रुग्णसंख्या ५७२ वर पोहोचली आहे. यामध्ये नाशिक शहर ४४, मालेगाव शहरात ४४८ वर रुग्ण पोहोचले आहेत. जिल्हाबाहेरील रुग्णांची संख्या १९ वर पोहोचली आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आकडा ६१ पोहोचला असून यात मालेगाव ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. तर आतापर्यंत ४५ रुग्ण करोनामुक्त झाले असून जिल्ह्यात १९ रुग्ण करोनामुळे दगावले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com