धक्कादायक : मालेगावी आतापर्यंत ३७ पोलिसांना करोनाची लागण
स्थानिक बातम्या

धक्कादायक : मालेगावी आतापर्यंत ३७ पोलिसांना करोनाची लागण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. जिल्ह्यातील अर्धी पोलीस यंत्रणा मालेगावी कार्यरत आहे. मालेगावात थैमान घातलेल्या करोनाची आता पोलीसांनाही लागन झाली असून हा आकडा 37 वर पोहचला आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे (एसआरपीएफ) जवानांची पॉझिटिव्हमध्ये अधिक संख्या आहे.

मालेगावी करोनाग्रस्तांची संख्या अडीचशेच्या घरात पोहचली आहे. हा वेग मोठा आहे. 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा रस्त्यावर उभी आहे.

27 जिल्हा तसेच राज्याच्या सीमांवर चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. तर मालेगाव येथे करोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर मालेगाव येथे पोलीस दलाची संख्या वाढवण्यात आली आहे. सध्या मालेगाव येथे 1 हजार 800 पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. तर स्वतः पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यादेखील तळ ठोकून आहेत.

परंतु मागील आठवड्यापासून करोनाने पोलीसांनाही ग्रासले असून सुरूवातीला एसआरपीएफचे 4 जवान पॉझिटिव्ह ठरले. यानंतर एक पोलीस कर्मचारी व त्याच्या पत्नीस करोना झाला. तर यानंतर मात्र अवघ्या चार दिवसात पोलीसांचा आकडा 37 वर पोहचला आहे. यामध्ये 23 एसआरपीएफचे जवान आहेत. यामुळे पोलीस दलात चिंतेचे वातावरण आहे.

एसआरपीएफचे जवानांची 90 जणांची एक कंपनी असते. यामुळे हे सर्व जवान एकाच ठिकाणी राहणे, एकाच ठिकाणी खाने तसेच एकाच बसमधून प्रवास करत असतात.

सामाजिक अंतर पाळले तरी सतत एकत्र राहण्यामुळे एसआरपीएफच्या जवानांमध्ये करोनाच लवकर फैलाव झाल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, पॉझिटिव्ह आलेले तसेच करोना संशयित जवानांची तपासणी करण्यात आली असून सर्वांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

तर जिल्हा ग्रामिण पोलीस दलातील अनेक कर्मचारी हे नाशिक येथील रहिवाशी आहेत. अनेकजण आतापर्यंत मालेगाव येथे जाऊन येऊन करत होते. परंतु या सर्वांना तेथे राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सर्व पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून संशयित वाटल्यास अशांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. तर करोनाग्रस्त पोलीस कर्मचारी व एसआरपीएफच्या जवानांना उपचारांसाठी नाशिक येथे दाखल करण्यात येत असल्याचे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com