नाशिकमध्ये नवे २३ कोरोना संशयित रुग्ण दाखल

jalgaon-digital
2 Min Read

२५९ होमकॉरंटाईन्सचे सर्वेक्षण पूर्ण : डॉ. सुरेश जगदाळे

नाशिक | प्रतिनिधी 

लासलगाव नंतर नाशिक शहरात करोना रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून गोविंद नगर जवळील तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर सील केला आहे. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवानानुसार नाशिक जिल्ह्यात एकूण २३ नवीन कोरोना सदृश्य रुग्ण दाखल झाले आहेत.

त्यामध्ये सोमवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांचे निकटवर्तीय १९ जण आहे. तसेच २५९ होमकॉरंटाईन असलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण आरोग्य विभागाच्या वेगवेगळया पथकांचे माध्यमातून करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली आहे.

सोमवार ६ एप्रिल रोजी एकूण २७ कोरोना सदृश्य रुग्णांच्या घशाच्या स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील (एनआयव्ही) राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रात पाठविण्यात आले होते.

त्यापैकी १३ अहवाल प्राप्त झालेले आहेत. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. उर्वरित अहवाल रात्री ९ वाजेपर्यंत प्राप्त होतील. सध्या शहरासह जिल्ह्यात २ करोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचेही श्री. जगदाळे यांनी दिली.

आज महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून गोविंदनगर परिसरातील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य विषयक तपासणी करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना संबंधित रुग्णांसाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये २१० रुग्णांच्या उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात १०० खाटा, डॉ. जाकिर हुसेन रुग्णालयात ७० खाटा, सामान्य रुग्णालय मालेगाव येथे २० खाटा व उपजिल्हा रुग्णालय कळवण २० खाटा इत्यांदीची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन, पीपीई किट व मल्टी पैरा मॉनिटर्स व तज्ज्ञ डॉक्टरांची पथके कार्यान्वित आहेत.

बाह्य परिसरात कोरोनाचे विषाणु पडलेले असतील त्यामुळे आपण बाहेर पडल्यानंतर कोरोना विषाणुचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नागरिकांना घरा बाहेर पडू नये प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *