नाशिक : करोना योद्धयांसाठी ‘अपोलो’रुग्णालयात 100 खाटा राखीव

नाशिक : करोना योद्धयांसाठी ‘अपोलो’रुग्णालयात 100 खाटा राखीव

नाशिक । प्रतिनिधी

करोना संसर्गाशी पहिल्या फळीत लढा देणार्‍या पोलीस तसेच आरोग्य विभागाच्या अधिकारी, सेवक अर्थात करोना योद्धयांसाठी अपोला रूग्णालयामधील 100 खाटा आरक्षीत करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

या रूग्णालयात एकूण दोनशे खाटा यापूर्वी प्रशासनने राखीव केल्या होत्या. त्यातील शंभर खाटा यापुढे फक्त पोलिस आणि आरोग्य कर्मचार्‍यांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.

याबाबतचे आदेश आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या घटना व्यवस्थापक तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत. करोनाशी दोन हात करणार्‍या आरोग्य कर्मचारी व पोलिसांना करोनाची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

मालेगावमध्ये त्याची प्रचिती येत असून, करोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्या 70 च्या घरात पोहचली आहे. याशिवाय डॉक्टर, नर्स व त्यांना सहाय्य करणार्‍या कर्मचारी अशा सुमारे 20 जणांना करोनाचा विळखा बसला आहे.

अचानक करोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. यापार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यापूर्वी शहरातील मोठ्या खासगी रूग्णालयांमध्ये काही बेड्स आरक्षीत केले असून, तिथे आवश्यकतेप्रमाणे उपचारासाठी रूग्ण दाखल करण्यात येत असतात.

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये पोलिसांसह आरोग्य कर्मचार्‍यांना करोनाची लागण झपाट्याने झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांना आरोग्य सेवा कमी पडू नये यासाठी अपोलो रूग्णालयातील 100 खाटा आरक्षीत करण्यात आल्या आहेत.

या हॉस्पिटलमधील एकूण 200 बेड्स आरक्षीत करण्यात आले आहेत. त्यातील शंभर बेड्स फक्त पोलिस व आरोग्य कर्मचार्‍यांसाठी आरक्षीत असणार आहे. यातून त्यांचे मनोबल अधिक वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com