…अखेर सरकारवाड्याला न्याय मिळणार; लवकरच कामाला सुरवात
स्थानिक बातम्या

…अखेर सरकारवाड्याला न्याय मिळणार; लवकरच कामाला सुरवात

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । पेशवेकालीन इतिहासाचे साक्षीदार आणि ब्रिटिशांच्या जुलुमी कारभार पाहणार्‍या सरकारवाडा या वास्तुला गटारीच्या पाण्याने वेढून इमारतीलाच धोका निर्माण झालेला असताना दोन महिन्यांपासून महापालिकेकडे मदत मागणार्‍या पुरातत्व विभागाच्या हाकेला आज (दि.13) महापालिका सार्वजनिक आरोग्य (मलनिस्सारण) विभागाने प्रतिसाद दिला. दीड वर्षांपूर्वीच भूमिगत गटार चोकअप झाल्याने हे काम करावयाचे असल्याने या कामास परवानगी द्यावी, अशा मागणीचे पत्र महापालिकेने पुरातत्व विभागाला दिले आहे. यामुळे आता लवकरच हे काम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या वास्तुत गेल्या ऑक्टोबर 2019 महिन्यात पावसामुळे अचानक मध्यवर्ती भागात (चौकात) अचानक सांडपाणी येऊन साठल्याने मोठी दुर्गंधी निर्माण झाली होती. या गटारीच्या पाण्यामुळे याठिकाणी इमारतीला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी यासंदर्भात महापालिका सार्वजनिक आरोग्य (मलनिस्सारण) विभागाकडे पत्र पाठवून यावर उपाययोजना करण्याची विनंती केली होती. मात्र हे काम आमचे नाही, असे तोंडी उत्तर काही अधिकार्‍यांनी दिले.

मात्र त्यानंतर पुन्हा पुरातत्व विभागाने पाठोपाठ तीन पत्र पाठविल्यानंतर याचे लेखी उत्तर देण्याचे मनपाने टाळले. मात्र महापालिकेच्या अधिकार्‍यांनी याठिकाणी जाऊन पाहणी करण्याचे काम केले. एकूणच एका ऐतिहासिक वास्तुला धोका निर्माण झाल्यासंदर्भातील तक्रार वरिष्ठ पातळीवर गेल्यानंतर आज महापालिका सार्वजनिक आरोग्य (मलनिस्सारण) विभागाने तातडीने पुरातत्व विभागाला पत्र देऊ यासाठी कराव्या लागणार्‍या कामाला अर्थात भूमिगत गटार लाईन टाकण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

महापालिकेने पुरातत्व विभागाला दिलेल्या पत्रात सरकारवाड्यालगत बोहरपट्टी येथे 150 ते 200 वर्षांपूर्वी टाकण्यात आलेली जुनी दगड बांधकामाची सांडपाण्याची मलवाहिका असून ही भूमिगत गटार लाईन चोकअप झाल्याने हा प्रकार घडल्याची कबुली दिली आहे. ही गटार कालबाह्य झाल्याने व त्यास सरकारवाड्याची आऊटलेट कनेक्शन जोडल्याने हे गटाराचे पाणी थेट वास्तुत मध्यभागी बाहेर आले आहे. आता याठिकाणी नवीन भूमिगत गटार लाईन टाकणे आवश्यक आहे. याकरिता सरकारवाड्याच्या बाहेर ही लाईन टाकण्यासाठी 7 ते 8 फूट खोल करावे लागणार आहे.

हे काम करण्यासाठी खोदाई ब्रेकरद्वारे करावी लागणार असून या वास्तुला काही धोका निर्माण होणार नाही, या दृष्टीने मार्गदर्शन करावे आणि या कामास परवानगी द्यावी असे महापालिकेने पाठविलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे. महापालिकेच्या या भूमिकेमुळे आता सरकारवाड्याचा गटारीच्या पाण्याचा एक धोका टाळण्यासाठी आता भूमिगत गटारींचे काम करताना दुसरा धोका निर्माण होणार नाही, असे सांगत महापालिकेने आपली जबाबदारी आता पुरातत्व विभागावर टाकली आहे. या प्रकारामुळे सरकारवाडा या वास्तुचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

उत्तरानंतर काम सुरू करणार
सरकारवाडा येथील पुरातत्व विभागाचे पत्र आल्यानंतर आमच्या अधिकार्‍यांनी याठिकाणी जाऊ पाहणी केली. याठिकाणी दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीची कालबाह्य भूमिगत गटार तुंबल्यामुळे हा प्रकार घडला आहे. आता याठिकाणी काम करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन व परवानगी मागितली आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर हे काम सुरू करू.
– शिवकुमार वंजारी, कार्य. अभियंता.

Deshdoot
www.deshdoot.com