३६५ दिवस अन बारा तास भरणारी एकमेव शाळा
स्थानिक बातम्या

३६५ दिवस अन बारा तास भरणारी एकमेव शाळा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । दि. २५ गोकुळ पवार : ग्रामीण भागातील शाळा म्हटलं कि, सकाळी दहाला भरलेली शाळा सायंकाळी पाच वाजता सुटलेली असते. अनेकदा या वर्गामध्ये शिकवणी न होता मूल इतरत्र फिरताना दिसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा बहुतेकदा नकारात्मकच असतो. पण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिवाळी जिल्हा परिषदेच्या शाळेने मात्र हा दृष्टिकोन बदलून टाकण्यात यश मिळवलंय. हि शाळा वर्षाचे ३६५ दिवस अन बारा तास चालणारी शाळा म्हणून जिल्ह्यात पहिलीच शाळा ठरली आहे.

तालुक्यातील शेवटचं टोक असलेल्या हरसूलपासून ४० किमीच्या अंतरावर हिवाळी हे गाव वसलेलं आहे. पायाभूत सुविधांची वाणवा असलेल्या या आदिवासी भागात या शाळेने जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. आपण नेहमी म्हणतो कि सरकारी वेळापत्रकाप्रमाणे शाळा भरत असतात. तसेच आपणही शाळेत असताना याच वेळापत्रकाप्रमाणे शाळेत गेलो आहे. पंरतु यास अपवाद ठरत हिवाळी येथील मात्र वर्षाच्या ३६५ दिवस आणि १२ तास सुरू असलेली बिनकुलूपाची शाळा ठरली आहे.

हिवाळी शाळेला या उंचीवर नेऊन ठेवणारा दुवा म्हणजे केशव गावित सर होय. गेल्या दहा वर्षांपूर्वी हा तरुण शिक्षक या शाळेवर रुजू झाला. यानंतर या शाळेचे रुपडे पालटण्यास सुरवात झाली. आपल्या उच्च शिक्षणाचा व अनुभवाचा उपयोग या शिक्षकांने आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी करण्याचे ठरविले. त्यांच्यामते विद्यार्थी केवळ विद्यार्थी राहू नयेत तर ते ज्ञानार्थी बनावेत या विचारातून त्यांनी शाळेमध्ये विविध उपक्रम घेण्यास सुरवात केली. आज या शाळेत वर्षाचे बाराही महिने आणि दिवसाचे बारा तास विद्यार्थी ज्ञानाचे आणि संस्काराचे धडे गिरवत आहेत.

केशव गावित यांनी सुरवातीला विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना हेरून त्यानुसार अध्यापन पद्धती विकसित केली. कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करण्यावर जोर दिला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण होऊन या शिक्षकाने परिपूर्ण असे शैक्षणिक ज्ञान मंदीर निर्माण केले. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शाळेची वेळ आहे. विद्यार्थ्यांचे पाढे पाठ असून संविधानाची कलमेही पाठ केली आहेत. अ‍ॅबेकस सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाचे धडे दिले जातात. तसेच विविध कलागुणांतमध्ये विद्यार्थी पारंगत आहेत. यामध्ये पेंटर, फिटर, टीचर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर इ.कामे मुलं स्वतः करतात. तसेच येथील शाळेचा आवारही आकर्षक असून येथील ‘हँगिंग गार्डन’, तरंगचित्रे, रंगविलेल्या आकर्षक भिंती, स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य इतर विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. अ‍ॅबेकस सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाचे धडे हिवाळीच्या आदिवासी मुलांना दिले

आदिवासी भागात बालपण गेल्यामुळे येथील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून होतो. त्यामुळे शाळेवर रुजू झाल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधत अध्यापन केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होऊन इतर ऊपक्रम राबविण्यास वाव मिळाला. हिवाळीसारख्या दुर्गम भागात काम करण्याची संधी मिळाल्याने अधिकच काम करण्यास प्रेरणा मिळाली.
-केशव गावित, शिक्षक

आदर्श गाव ‘आउट ऑफ नेटवर्क’

हिवाळी शाळेचा आदर्श जिल्ह्यात निर्माण झाला असला तरी हे गाव अद्यापही मोबाईल नेटवर्कपासून दूर आहे. यामुळे संपर्क करावयाचा झाल्यास दोन ते तीन किलोमीटर चालत जाऊन रेंज शोधावी लागते. येथील शाळेचा नावलौकिक झाला असला तरी गाव संपर्काच्या क्षेत्राबाहेर आहे.

Deshdoot
www.deshdoot.com