एक लाख शेतकरी ‘पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेपासून वंचित
स्थानिक बातम्या

एक लाख शेतकरी ‘पंतप्रधान किसान सन्मान’ योजनेपासून वंचित

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । जिल्ह्यातील 1 लाख 3 हजार शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अनुदानापासून वंचित आहेत. वर्षभरात तीन टप्प्यात प्रत्येकी दोन असे एकूण सहा हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. मात्र पहिल्या टप्प्यातील अनुदानदेखील जमा झालेे नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात 4 लाख 13 हजार शेतकरी या योजनेस पात्र आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांना खूश करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना अंमलात आणली. त्यानुसार अल्प भूधारक शेतकर्‍यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे या योजनेचे नोडल ऑफिसर होते. पहिल्या टप्प्यात बहुतांशी शेतकर्‍यांच्या खात्यात अनुदान जमा झाले. पण आता वर्षभराचा कालावधी होत आल्याने सर्वच शेतकर्‍यांना तीनही हप्त्यांचे मिळून सहा हजार रुपये प्राप्त होणे आवश्यक होते.

पण जिल्ह्यातील पात्र 4 लाख 13 हजार शेतकर्‍यांपैकी पहिला हप्ता 1 लाख 3 हजार 72 शेतकर्‍यांना मिळालेला नाही. तर दुसरा हप्ता 1 लाख 15 हजार 640 आणि तिसर्‍या हप्तापासून 2 लाख 58 हजार 807 शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे हे अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दुसरीकडे प्रशासनाकडून कुणाला पैसे मिळाले अन् कुणाला मिळाले नाही या माहितीचे अद्ययावतीकरण करण्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.

त्यामुळे कुणाला लाभ मिळाला, कुणाला मिळाला नाही तसेच कुणाचा डाटा अपूर्ण किंवा अयोग्य आहे, माहिती परिपूर्ण नाही याचीही माहिती प्रशासनाकडे उपलब्ध नाही. केवळ तांत्रिक बाबींचे कारण पुढे करून महसूल विभागाकडून वेळ मारून नेण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोपही शेतकर्‍यांकडून होत आहे. आतापर्यंत 3 लाख 9 हजार 928 शेतकर्‍यांना पहिला तर 2 लाख 97 हजार 360 शेतकर्‍यांना दुसरा हप्ता मिळाला आहे, तर 1 लाख 54 हजार 193 शेतकर्‍यांना फक्त तिसरा हप्ता प्राप्त झाला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com