Thursday, April 25, 2024
Homeनाशिक#जागतिक चहा दिवस : चहाप्रेमी नाशिककर आणि चहाचे वेगळेपण

#जागतिक चहा दिवस : चहाप्रेमी नाशिककर आणि चहाचे वेगळेपण

नाशिक | प्रशांत निकाळे नाशिककर म्हटलं कि मिसळ बरोबर चहाचीही आठवण होते. चहाप्रेम इतकं कि घरात कोणी पाहुणा आला तर चहा घेणार का? असं आपणच विचारतोच. अनेकांची सकाळची सुरवातच या चहाबरोबर सुरु होते. यामुळे खऱ्या अर्थाने अनेक नाशिकरांचे जीवनही या चहाने व्यापले आहे. नाशिकच्या प्रत्येक कोपऱ्यावर तुम्हाला चहाची टपरी दिसेल. त्यामुळे टपरीवरच्या कट्टिन्गला मात्र पर्याय नाही. ठिकठिकाणच्या ह्या चहाच्या टपऱ्या म्हणजे दिवसाच्या कुठल्याही वेळी आणि कुठेही अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या चहाचे हमखास ठिकाण म्हणजे टपरी.

त्यामुळे चहाप्रेमींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात चहाप्रेमी खुप आहेत. पण यामध्ये काहीजण प्रफुल्लित होण्यासाठी चहा पितात, तर काहींना विश्रांती घेण्यासाठी चहा लागतो, आणि काहींना स्वत:ला शांत करण्यासाठी, तर काही स्वत:ची झोप उडविण्यासाठी चहाचा उपयोग करतात. त्यामुळे चहा पिणारे नाशिककर जसे वेगवगेळ्या प्रकारचे आहेत तसेच या नाशकात चहाचेही विविध प्रकार पडतात.

- Advertisement -

नोगोरी टी :

नागोरी हे राजस्थान आणि गुजरातमधील मुस्लिम समुदायाचे लोक आहेत. ते परंपरागत दुग्ध व्यवसाय करीत असतात. त्यांनी बनवलेला चहा ‘नागोरी चाय’ म्हणून ओळखला जातो. या चहात दुधाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे इतर चहाच्या प्रकारांपेक्षा याची चव वेगळी असते. हा चहा तुलनेने घट्ट असतो.

इराणी चाय :

गेल्या शतकात मुंबईच्या बंदरात पर्शियन स्थलांतरितांनी प्रवेश केला आणि मुंबईहून ते पुण्यात आणि नंतर हैदराबादला आणि इतर ठिकाणी स्थलांतरित झाले. त्यांच्याबरोबर इराणी चहाची संकल्पनाही भारतात आली. इराणी चहा आणि उर्वरीत चहाच्या बनविण्याच्या शैलीत फरक आहे. बंद असलेल्या भांड्यात चहाची पाने पाण्याबरोबर उकळतात. दुध देखील वेगळ्या भांड्यात उकळवले जाते आणि दुधाची साय हि वेगळी गोळा केली जाते. नंतर चहा देताना प्रथम दूध ओतले जाते नंतर काळा चहा हा त्यात टाकला जातो आणि त्यावर दुधाची साय टाकली जाते. तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही जा इराणी चहाची चव सारखी वाटेल.

मसाला चहा :

तुम्ही कोणत्याही कॉफीहाऊसमध्ये किंवा चहाच्या टपरीवर जा मसाला चहा हा तुम्हाला मिळेलच. आपल्याला अतिशय सोपा वाटणाऱ्या चहाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इंडियन स्पाईस टी अथार्त ‘मसालेदार चहा’ हा राजेरजवाडे आणि आयुर्वेदाच्या कथांमध्ये नेहमीच उल्लेखला आहे. आताच्या मसाला चहामध्ये असंख्य बदल झाले आहेत आणि आता तो जगभरात प्रसिद्ध झाला आहे.

तंदुरी चहा :

तंदुरी चहा हा भारतीय चहाचा एक वेगळाच प्रकार आहे. या रेसिपीमध्ये चहा नेहमीच्या भारतीय पद्धतीने तयार केला जातो. लहानगी मातीची भांडी (कुल्लड) तंदूरमध्ये गरम केली जातात आणि तयार चहा मातीच्या गरम भांड्यात ओतला जातो. या प्रक्रियेने गरम मातीच्या भांड्याचा स्वाद हा चहात येतो आणि एक वेगळीच चव देतो.

एकूणच नाशकात अनेक चहाचे प्रकार चाखायला मिळतात. त्यामुळे काही नाशिककरांनी या चहाची चव घेतली नसेल तर नक्की घ्या, कारण नाशिक हे चहाप्रेमींचे शहर म्हणून ओळखले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या