‘कोनांबे रन’ मध्ये हरसूलच्या धावपटूंची बाजी; आकाश शेंडे, सुशीला चौधरी अव्वल
स्थानिक बातम्या

‘कोनांबे रन’ मध्ये हरसूलच्या धावपटूंची बाजी; आकाश शेंडे, सुशीला चौधरी अव्वल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर । वार्ताहर 

विनर्स ऍकेडमी व कोनांबे ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोनांबे रन मध्ये जिल्ह्यासह राज्यभरातील ३०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विविध वयोगटात झालेल्या धावण्याच्या या स्पर्धेवर आदिवासी व दुर्गम भाग असणाऱ्या हरसूलच्या धावपटूंनी आपले वर्चस्व राखले. पुरुषांच्या खुल्या गटातून आकाश शेंडे व महिलांच्या गटातून सुशीला चौधरी यांनी बाजी मारली.

सोनांबे, सोनारी, कोनांबे, डुबेरे, लोणारवाडी सिन्नरमधील गावे सैनिकांची गावे म्हणून ओळखली जातात. या गावांमधून सैन्यात आणि पोलिसदलात जाणाऱ्या तरुणांची संख्या अधिक असून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या गावांमधील तसेच तालुक्यातील असंख्य तरुण-तरुणी संरक्षण दलाशी संबंधित परीक्षांची तयारी करत आहे.

त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोनांबे रन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि.२)   करण्यात आले होते. .कोनांबे ग्रामपंचायत आणि विनर्स ऍकेडमीच्या वतीने आयोजित ही मॅरेथॉन कोनांबे-शिवडे रस्त्यावरून सुरु करण्यात आली होती.

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू श्रद्धा नलमवार, सरपंच संजय डावरे, डॉ. राजेंद्र गोऱ्हे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शरद रत्नाकर यांचेसह मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनचे उदघाटन करण्यात आले.   जिल्ह्यातील तसेच राष्ट्रीय व राज्य पातळीवरील  अनेक खेळाडू आणि हौशी धावपटूनी या स्पर्धेत सहभागी झाले होते.

स्पर्धा संपल्यावर आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. सिन्नर तालुक्यातील खेळाडूंना आपण नेहमीच प्रोत्साहन देत आलो आहोत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असणारे क्रीडासंकुल लवकरच खेळाडूंच्या सेवेत येणार असून कोनांबे परिसरात सैन्यदलासाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी देखील अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे कोकाटे यांनी घोषित केले. जिल्हयातील ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील सिन्नर विकसित होणाऱ्या  क्रीडा सुविधांचा लाभ घेता येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शाळांमध्ये धनुर्विद्या प्रशिक्षण 

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात खेळाप्रती अधिक संवेदना दिसून येतात. मात्र योग्य मार्गदर्शन आणि सुविधांचा अभाव यामुळे खेळाडूंना अडचणी येतात. विनर्स ऍकेडमीच्या वतीने सिन्नर तालुक्यातील खेळामधील गुणवत्ता हेरण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यात दर शनिवारी कोनांबे, सोनांबे, डुबेर येथील शाळांमध्ये धनुर्विद्येचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांना नेमबाजी किंवा धनुर्विद्या शिकायची असेल त्यांच्यासाठी देखील कोनांबे येथे वर्ग सुरु करण्यात आले असल्याची माहिती स्पर्धेच्या संयोजक श्रद्धा नलमवार यांनी दिली.

‘कोनांबे रन’ चे विजेते 

१२ वर्षाआतील मुले व मुली –  धनराज पवार , सानिका चौधरी (हरसूल),
१४ वर्षाखालील मुले व मुली –  अनिल चौधरी, रिंकू चौधरी (हरसूल),
१८ वर्षाखालील मुले व मुली – संदिप चौधरी, रेखा शिंगाडे ( हरसूल)
खुला गट महिला व पुरुष – आकाश शेंडे, सुशिला चौधरी (हरसूल )

Deshdoot
www.deshdoot.com