शेळीमुत्राच्या प्रयोगातुन फुलवली शेती; आदिवासी महिलेची यशोगाथा
स्थानिक बातम्या

शेळीमुत्राच्या प्रयोगातुन फुलवली शेती; आदिवासी महिलेची यशोगाथा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | गोकुळ पवार
कृषिक्षेत्र म्हटलं कि पुरुषाचा दबदबा या क्षेत्रात असल्याचे म्हटले जाते . परंतु आजची स्त्री फक्त स्वयंपाक घरात न रमता समाजाचेही प्रतिनिधीत्व करीत असते. अन यातही ग्रामीण भाग असला तर स्रियांना चूल आणि मुलं इतकंच महत्व दिले जाते. पण याला अपवाद ठरल्या आहेत त्या रंजनाबाई खोटरे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गणेशगाव (वा) येथील महिला शेतकरी म्हणून नावारूपास आलेल्या रंजनाबाई खोटरे यांनी रासायनिक खतांवर निर्भर न राहता शेळीच्या मूत्राचा उपयोग करीत शेती फुलवली आहे. यासाठी अनेक पिकांवर प्रयोग करीत त्या इतरांनाही प्रोत्साहित करीत आहेत.

वनस्पतीला लागणारे घटक योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पुरवणं म्हणजे शेती. रासायनिक खतांचा प्रमाणाबाहेर, अवेळी पद्धतीने होणारा वापर तसेच सेंद्रिय पदार्थांचा वापरही प्रमाण आणि वेळेच्या हिशोबात अयोग्य झाला असल्याने जमिन आणि शेतीचे नुकसान होते आहे. त्यामुळे शेळीच्या मूत्राचा उपयोग हा चांगला असून या मुत्राच्या वापरामुळे जमिनीत लाभदायक जीवाणूंची संख्या प्रचंड वाढली. तसेच पीक उत्पादनातही वाढ झाली असून उत्पादनखर्चात बचत करणारा हा प्रयोग असल्याचे त्या सांगतात.

रुख्मिणी उदार यांनी काही वर्षांपूर्वी शेळी पालन सुरु केले. या शेळ्यांचे संगोपन करीत असतांना पिलांचे कपडे धुण्यासाठी या मूत्राचा उपयोग केला. यामध्ये फरक दिसून आल्याने त्यांनी पहिला प्रयोग टोमॅटो पिकांवर पहिला प्रयोग करून पहिला आणि तो यशस्वीही झाला.

त्या सांगतात कि, टोमॅटो फुलोऱ्यामध्ये आला असताना अचानक झाडावर अळी पडली. त्यामुळे शेळीच्या मूत्राचा उपयोग करून पाहिला .तर त्याचा परिणाम टोमॅटो पिकांवर चांगला झाला. परिणामी पुढे दोन तीनदा या मूत्राची औषध फवारणी केल्याने पिकाचे उत्पादनही वाढले. त्यानंतर अवकाळी पावसाने भात पीक ऐन पोटऱ्यात असतांना काजळी पडली. त्यामुळे भात काळे पडून येणारे उत्पादन खराब होत चालले होते. त्यावेळी धाडस म्हणून मूत्राचा उपयोग करावयाचा ठरला. यावेळी दहा टक्के मुत्राचा फवारा मारला. त्यानंतर एक दोन आठवड्यांनी दुसरा फवारा मारला. त्यानंतर पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये एकही फवारा मारला नाही. भात कापणी झाल्यानंतर असे लक्षात आले कि अवकाळी पावसाने खराब केलेल्या भाताचे उत्पादन अपक्षेपेक्षा अधिक झाले. या दरम्यान कोणत्याही रासायनिक औषधांची गरज पडली नाही. त्यामुळे शेळीच्या मुत्रामध्ये पिकाची वाढ व उत्पन्नावर निश्चित चांगले परिणाम करणारी द्रव्य आहेत असे त्यांनी सांगितले.

अशी आहे प्रक्रिया
शेळ्यांसाठी गोठा तयार करण्यात आला असून मूत्र एकत्र करण्यासाठी तळाशी प्लॅस्टिक टाकले आहे. येथून पुढे एका खड्ड्यात शेळीचे मूत्र गोळा केले जाते. खड्ड्यातून बाहेर काढल्यानंतर एका बाटलीत गाळून घेतले जाते. जेणेकरून यामध्ये आलेले इतर घटक बाजूला काढता येते. एका दिवसाला साधारण दोन तीन लिटर शेळीचे मूत्र तयार होत असते.

भात, टोमॅटो तसेच रब्बीसाठी रासायनिक खतांचा वापर असल्याने वर्षभरासाठी लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च होत होता. परंतु आता शेळीच्या मूत्राचा उपयोग अधिक करीत असल्याने खर्च आणि वेळेचीही बचत होते आहे. तसेच घरच्या घरी उत्पादन होत असल्याने गावातील इतरांनाही या प्रयोगासाठी प्रोत्साहित करीत आहोत.
-रुख्मिणी उदार, शेतकरी

Deshdoot
www.deshdoot.com