डॉ. पिंप्रीकर यांना संशोधनाकरता पेटंट; दंत नलिकेच्या एकाच औषधात होणार निर्जंतुकीकरण
स्थानिक बातम्या

डॉ. पिंप्रीकर यांना संशोधनाकरता पेटंट; दंत नलिकेच्या एकाच औषधात होणार निर्जंतुकीकरण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक। प्रतिनिधी

दंतनलिकोपचार (रूट कॅनॉल ट्रीटमेंट) याविषयातील संशोधनाकरता भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने शहरातील दंतवैद्य डॉ. मंदार पिंप्रीकर यांना पेटंट प्रदान केले आहे. यामुळे दंतनलिका निर्जंतुकीकरण आता एकाच औषधाने करणे शक्य होणार आहे. यामुळे दंतवैद्य तसेच रूग्णांना मोठा लाभ होणार आहे.
याबाबत डॉ. पिंपरीकर यांनी सागीतले की, हे पेटंट बौद्धिक संपदा अधिकार व कायद्याअंतर्गत मिळालेले आहे. दंतनलिका निर्जंतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे औषध तयार केले आहे. तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. मंदार पिंप्रीकर यांनी भारती विद्यापीठ, पुणे इथून दंतशल्यविशारद ही पदवी घेतलेली आहे आणि न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथून दंतनलिकोपचार या विषयात पदविका प्राप्त केलेली आहे. याच विषयात त्यांचे आणखीन संशोधन सुरू असून त्यांनी इतर काही उत्पादनांसाठी पेटंट अर्ज दाखल केलेला आहे.
संशोधनाच्या जोडीला देशातील आणि परदेशातील दंतवैद्यांना प्रशिक्षण देण्याचेही डॉ. मंदार पिंप्रीकर काम करतात.गेल्या वर्षी त्यांनी याच विषयातील इतर काही तज्ञांच्या मदतीने एक आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती.

दंतनलिकोपचार (रूट कॅनॉल ट्रीटमेंट) करताना निर्जंतुकीकरण करण्यासाठी तीन चार वेळी विविध औषधांचा वापर करावा लागतो. यामुळे यामध्ये दंत वैद्यांचा अमुल्यवेळ खर्च होतो. तसेच रूग्णाचाही वेळ व पैसा खर्च होतो. हे निर्जंतुककरण एकाच औषधाने व एकाच वेळी करण्याबाबत डॉ. पिंपरीकर यांनी संशोधन सुरू केले होते. तीन वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांना यात यश आले आहे. यासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाच्या पॅनल समोर संशोधन निबंध, तसेच प्रत्याक्षिके सादर करावी लागली. यानंतर औषधाच्या फार्म्युल्यासाठी हे पेटंट देण्यात आले असून ते 20 वर्षांसाठी आपल्याकडे असणार आहे. या औषधाच्या मोठ्या प्रमाणात निर्मितीसाठी लवकरच प्रयत्न करण्यात येणार आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मेक ईन इंडिया अंतर्गत उत्पादन

मिळालेले पेटंट हे औषधाच्या फॉर्म्युलासाठी असून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया संकल्पर्नेें अंतर्गत या औषधाचे उत्पादन नाशिक येथेच सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. पेंटट तर मिळाले परंतु आता एफडीएसह इतर विभागांचे सकारात्मक सहकार्य मिळाले तर औषध निर्मितीस लवकर सुरूवात करता येणे शक्य आहे.

– डॉ. मंदार पिंपरीकर, दंतरोगतज्ञ

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com