कथा : एकीचं बळ

कथा : एकीचं बळ
Pro.Dr. R D shinde

कोंबडयान बांग दिली, तशी गावातली घर दिवाभत्तीनं जागी झाली. बायका आन् माणसं आपलं आपलं काम उरकू लागली. संभान सकाळी आठ वाजता इठ्ठल मंदिरात मिटिंग ठेवली म्हणून, गावकर्‍यांची पावल मंदिराकडे वळाली. समदं गाव मंदिरात जमा झालं. गावाच्या पाण्यासाठी ही मिटिंग ठेवली होती. गावच्या सावकाराकडे (महिपतराव) पाण्यासाठी लय इनवण्या केल्या. पर स्वत:च्या मालकीच्या हिरीतनं गावाला पाणी न देता, स्व:ताची शेती फुलवू लागला. गावात सुरू केलेल्या सावकारीतून मिळालेल्या पैशांची मस्ती होती. गावातली माणसं आन् जनावरं पाण्यासाठी वणवण भटकताय, त्यावर उपाय करण्यासाठी संभान मिटिंग ठेवली. शहरात राहून चार बुक शिकलेला संभा गावकर्‍यांना हुशार वाटायचा.संभा शिकला तरी गावात आल्यावर गावासारख वागायचा बोलायचा. गावाला आपलासा वाटायचा. गावासाठी संभाच काहीतरी करेल असा इश्वास गावाला व्हता…

जमलेल्या गावकर्‍यातील सुभा नाना म्हणाला,‘‘ आर संभा पुढं काय करायचं म्हणतोस ? समदं गाव तुझ्याकडं आशेनं बघतय.’’ संभा शांतपणे म्हणाला,‘‘ नाना दर वर्षाला पाण्यासाठी गावान मरण्यापेक्षा कायमचा इलाज करायचा म्हणतोय.’’ त्याच्या बोलण्यानं समद्या गावकर्‍यांच्या अशा जाग्या झाल्या. बसल्या जागवरच राजाराम बापू म्हणाला,‘‘ आर असं अर्धेच बोलून आम्हास कोडयात टाकू नगसं. मनात हाय ते समदं बोलून टाक. आता तू सांगशिल तसं करायचं, नाय तर पाण्यापायी मरायचं? ’’ समद्या गावकर्‍यांनी संभाला बोलायला लावलं. संभा म्हणाला,‘‘ मला तुमची साथ हवी.’’
समद्यांनी साथ देण्याचं कबूल करताना, पुतळाबाई म्हणाली,‘‘ आर संभा या पाण्याचा टिपका टिपका गोळा करता करता, माझी सासू गेली. माझ्या संग माझ्या पोरीच आणि सुनचं आयुष्य जातय. आम्ही पाण्यासाठी रोज मरतोय. पण नंतर येणार्‍या बायकांना तरी सुखानं जगू दे. पाण्याच्या नादात मरण्यापेक्षा, तुझ्यासंग पाण्यासाठी काम करता करता मेलेलं बरं. पर काम केल्यानं गावाला पाणी मिळलं नव्हं! ’’

पुतळाबाईच्या बोलण्यानं अख्खं गाव आवक झालं. गावातील बायका पाणी भरायचं काम गुराढोरासारखं करत्यात. दरवर्षाला पाणी वाहून वाहून समदं शरीर हाडकुळ झालयं. पण बोलणार कोणाला? चुलीपुढंच्या कामात आन् विहिरीच पाणी वाहण्यात गावच्या बायकांचा जलम गेला. सगळ गाव इचारत पडल होतं. सगळीकडची शांतता पाहून पुजाराच्या तुका बोलला,‘‘ सकाळी देवाला शिळया पाण्यानं अंघोळ घालायची बी मला लाज वाटते. गावच्या हिरीरीत पाणी नाय. दुसरीकड महिपतराव सावकाराच्या हिरीत पाणी हाय, पर तो देवाला तांब्याभर पाणी देत नाय.’’ त्याच्या बोलण्यावर समद्या गावात सावकाराबद्दल राग वाढला. सावकार म्हणजे गावचा नासका आंबा हाय. ‘‘ जित्या माणसाला आन् जनावरांना पाणी देत नाय, तिथ तुझ्या देवाला देणार का ? तो म्हणतो ‘मी लांबून पाईपलाईन केली हाय. त्याचा खर्च कोण देणार?’ गावाला लुटून तो सावकार झाला. आन् गाव पाण्यासाठी त्याच्या पुढं भिकारी झालं. हे थांबव संभा.’’ गोपीचंद तात्या बोलताना जणू समद गाव बोलायला लागलं. संमद्याच ऐकून झाल्यावर संभा म्हणाला,‘‘ आपल्या गावाच मरण रोज पाहतोय. आपल्या मरणाला आपण भी जबाबदार हाय. आपण एक होऊन कधी गावचा इचार केला नाय. परत्येकांन आपलं सुख दु:ख सर्वांपुढ वाचलं. पाण्यासाठी गाव कधीच एक झालं नाय. तव्हा आता पाण्यासाठी समद्यांनी एक होऊन काम करूया. या कामानं पुढच्या पावसाळयात गावाला चांगल दिस येतील.’’

संभाच्या आश्वासनावर, मोठया अपेक्षानं भाऊ नाना म्हणाला, ‘‘आर तु सांगितलेलं काम गावानं केलं तर, पुढचं वर्षी गाव पाण्यानं भरल का.? ’’ जमलेली समदी माणसं बोलायला लागली,‘‘ बाकीचं इषय वाढवू नका, काम काय करायचं तेवढं सांग?’’ संभा म्हणाला,‘‘ उद्या सकाळी आठ वाजता डोंगरातल्या काळुबाईच्या देवळाजवळ जमा. येताना दिसभरासाठी भाकर, पाणी, टिकाव, खोरी, घमेली आन् लोखंडाच्या पाहारी घेऊन या’’ एवढं बोलून सभा संपली. संभाच्या डोक्यात काय खुळ हाय? हे लोकांना कळना. पण देवळाजवळ म्हंटल्यावर, पाण्यासाठी देवाला नवस करायचा असलं. अस ईचार डोक्यात घेऊन गावकरी घरला गेले. दुसर्‍या दिवशी काळुबाईच्या देवळाजवळ बायकापोरांसह गाव जमा झालं. त्याच प्रमाणे प्रत्येकानं माणसांतील आन् जनावरातील देव वाचविण्यासाठी पाण्याचा बंधारा बांधून, देवानं दिलेलं पाणी आडवायचं आणि देवानं दिलेल्या जमीनीत जिरवायचं.’’ संभाच बोलण काहींच्या लक्ष्यात येत नव्हतं. पण रामायणातील सेतू आणि पाण्याचा बंधारा यांचा संबंध कळाला. देवाच नाव घेत दगड उचलायचा आणि बंधारा बांधायचा. गावकरी दगड, माती गोळा करू लागले. लहान पोर हाताला झेपेल अशी दगडी गोळा करीत, बंधार्‍याजवळ पोहचवत होती. बंधारा बांधायचा काम सुरू झालं. काहींनी टिकावाने माती खोदून बंधार्‍याची खोली वाढवू लागले. समंद काम जोरात चाललं होत. सगळयाच्या डोक्यात पाण्याचा इचार होता.

उन्ह मध्यान आल्यानं जेवणाची येळ झाली. जेवणाच्या येळी डोक्याला ऊन लागू नये म्हणून, डोक्यावर फडके घेत मोठया दगडाच्या आडोशाला गटागटाने माणसं जेवायला बसली. उनात जेवायला बसलेली म्हणसं बघ्ाून, पार्वती संभाला म्हणाला,‘‘ उन्हात काम करून तापलेल्या माणसांना झाडांची सावली नाय. कस जेवण करायचं गावकर्‍यांनी.? ’’ ‘‘अग आतापर्यंत गावकर्‍यांनी गावच्या आडचणी समजून घेतल्याच नाही. ज्यान त्यानं स्वत:च्या आडचणीकडं पाहिलं. जरा कळू दे गावकर्‍यांनाही गावाच्याही अडचणी सोडवायच्या असतात.’’ संभा शांतपणे पार्वतीशी बोलत होता. एवढयात, गावचा सावकार महिपतराव डोक्यावर छत्री धरत कपटयागत सगळीकडं बघत येत होता. त्याला पाहताच गावकर्‍याचं डोक तापलं. सावकार संभाजवळ येत हसत हसत म्हणाला,‘‘ आर संभा कशाला गावच डोक्यात खुळ घेतोस. तू शिकलास शहराकड गेलास तर, तुझ भलं होईल. कशाला या येडयांच्या नादाला लागून स्वत:ची जिंदगी भरबाद करतोस.’’
सावकराच बोलण ऐकून गावकरी जेवायचं जागच्या जागी थांबल. संभानं तुम्ही जेवा असं खुणावताच गावकर्‍यांनी जेवायला सुरूवात केली.

संभा गावकर्‍यांच्याकडं पाहून झाल्यावर म्हणाला, ‘‘ सावकार माझं कल्याण होईल पण, या गावाच्या कल्याणाच काय? अहो तुमच्याकडं पैसा आहे. विहिरीत पाणी आहे. देवाला आंधोळ घालण्यासाठी तुमच्या विहिरीवरचं तांब्याभर पाणी मिळत नाही. या काळुबार्इच्या देवीपासून पाणी अडवून गावचं भलं करावे म्हणतोय.’’ गावाचं भल करायला निघालेला संभा, आपल ऐकायत नाय, याचा राग सावकाराला आला. समद्या गावकर्‍यांकडे पाहत म्हणाला,‘‘ ज्यांनी ज्यांनी माझ्याकडून कर्ज घेतल हाय त्यांनी या महिन्याच्या अखेरीस व्याज जमा करा. हेच मी सांगायला आलोय. (संभाकडं पाहत) मी तुमची काम पाहायला नाही आलो.’’ एवढ बोलून तो तरातसा निघ्ाून गेला. सावकराचं बोलण ऐकून गावकर्‍यांनी भाकरी खाण सोडून दिलं. त्यांना भाकरी कडू लागू लागली. गावकर्‍याकडं पाहत संभा ‘ मी हाय ना’ असं मानेनं खुणवत सांगू लागला. दिवसभरात पंधरा छोटे बंधारे बांधून झाले. पाच मोठे बंधारे बाकी होते. दिवसभर काम करून उन्हात भाकरी खाणारी माणसं अन् सावकाराचा गावावरचा सावकारीचा रूबाब संभाला गप्प बसू देत नव्हता. सारखं खटकत होत. यांचा इचार करता करता दिवस कधी संपला हेच कळलं नाय. सूर्य मावळायला लागला, तशी माणसं घराकडं चालायला लागली.घराकडं जाताना काळुबार्इच्या देवळाकडं पाहत हात जोडत यश दे म्हणत होते.

दुसर्‍या दिवशी ठरल्या प्रमाणं सगळं गाव डोंगरात काळुबार्इच्या मंदिराजवळ जमा झालं. वाटून दिल्याप्रमाणे काम सुरू झालं. बंधार्‍याला दगड लावतांना, अनेकांच्या मनात कामाबद्दलचा इचार आला. राधा अक्का म्हणाली,‘‘आर संभा असं दगड टाकून काय व्हनार हाय.? आम्हा येडयांना काय बी समजत नाय तूच समजावून सांग रं?’’ संभा सगळयांना माहिती सांगू लागला, ‘‘अक्का सोन्याची शेती करायची म्हणजे, मातीत सोनं पुरलं पाहिजे. आपल्यासाठी सोन्याच बी म्हणजे देवानं दिलेला पावसाच्या पाण्याचा थेंब हाय. हे सोनं जमीनीत मुरवायचं आणि सोन्यासारख पीक घ्यायचं. ’’ राधा अक्का हसत हसत म्हणाली,‘‘ देवा भगवंता आमच्या एवढया डुया गेल्या, पर एकाला बी सोन्याचं बी गोळा करायचं जमल नाय. तुला जमलंं. देवी काळुबाई गावाचं सोनं करणार्‍या संभाच्या आयुष्याचं सोन कर ग. गावाच्या भल्यासाठी पोराच्या हाताला यश येऊ दे. तुझी खणानारळानं ओटी भरतें.’’ म्हणत देवीला हात जोडले. संभा हसत हसत पुढच्या गटाकडे गेला. ‘

उन्हातली माणसं आन् शेतातली कुसळं’ संभाच्या डोक्यात बसली होती. त्याच मन बैचन झाल्याच पाहून, पार्वती संभाला म्हणाली,‘‘ संभा काय इचार करतोस.?’’ संभा बोलला, ‘‘माणसाचं आणि शेतातील कुसळांच नशिब बदलायच. प्रत्येक शेताच्या बांधावर आंबा आणि चिंचासारखी झाड लावायची आहेत. सावलीबरोबर झाडांच्या फळामुळं सगळयांच्या पैसा हाताला तर सावकाराची गरज लागणार नाही.’’ ‘‘संभा तुझी आयडीया लय भारी हाय. आपण देवाच्या नावाखाली झाडं लावूया. पण मला गावाला लुबाडणारा सावकार मनात सारखां खुपतोय. त्याने गावाला लय लुटलय.’’ पार्वती बोलू लागली. संमद चांगल होईल असं म्हणत दोघेही गावकर्‍यांबरोबर कामाला जुपले. संभा दुसर्‍या दिवशी तालुक्याला वनअधिकार्‍याला भेटला. गावात झाडे लावण्यासाठी आंबा आणि चिंचची पाचशे झाडांची मागण्ी केली. अधिकार्‍यांनी काही झाडं सोबत दिली. बाकीची झाड पावसाळा सुरू होण्यापूर्वी मिळतील असं सांगितले. मिळालेली झाडं घेऊन संभा गावाकड आला. पार्वतीच्या डोक्यातून दिवसभर सावकार जात नव्हता. तीने सावकाराची विहिर बघितली. विहिरीच्या खालच्या बाजूला ओढया शेजारी राजाराम दादाची जागा होती. राजाराम दादाची जागा बघताच, तिला हसायला आलं.

पंधरा दिवस काम करीत गावातील लोकांनी पन्नासच्या पेक्षा जादा लहान मोठे दगडी बंधारे बांधले. आता गावकर्‍यांच्या हाताला काम पाहिजे. म्हणून संभानं आणलेली झाडं देवीसमोर ठेवली. गावातील सर्व महिलांना सांगितलं की, देवीच झाड आहे. ते प्रत्येकांनी आपल्या शेताच्या बांधावर लावा. सगळया महिलांनी प्रत्येकी दोन झाड उचलली. पार्वती गावकर्‍यांना म्हणाली, ‘‘ काल रातच्याला देवी काळुबाई संभाच्या स्वप्नात आली. आपण सगळयांनी देवीच्या दारात काम केलीत. तीच आंगण साफ केलं म्हणून प्रसन्न झाली. म्हणाली,‘राजाराम दादाच्या ओढयाला विहिर खोदायला सुरूवात करा. पाण्याबरोबर मी तिथंच येणार हाय.’’ संभा तिच्याकडं पाहत बसला. गाव खूश झालं. पुढे ती म्हणाली, ‘‘ उद्यापासनं पुरूष मंडळीनी राजाराम दादाच्या शेतात जमाचं. आन् देवीच नाव घेत विहिर खोदायला सुरूवात करायची. महिलांनी बांधावर झाडं लावायची म्हणजे शेतात सोनं पिकवलं.’’ सगळयांना आनंद झाला. सगळयांनी होकार देत, आनंदात घराकडं गेली. सगळे गावकरी गावकडं चालले संभा पार्वतीला म्हणाला,‘‘ अग ही सगळी आडाणी माणसं आहेत. त्याचा तु फायदा घेऊ नकोस. देवाच्या नावाखाली खोटं बोललीस उद्या पाणी नाय लागलं तर, आडचणीत येशील.’’

पार्वती हसत म्हणाली,‘‘ संभा मला सगळं कळतय, पण पाणी नसल्यानं आणि सावकाराच्या जाचानं गावाला होणारा त्रास मला पाहवत नाय रं. यांना विज्ञान सांगून त्यांचा विकास होणार नाय. अशा भाबडया लोकांच चांगल करण्यासाठी देवाचं नाव वापरून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. तू देवीच्या नावानं गावात पन्नासच्या वर लहान मोठे बंधारे बांधलेस. देवीच्या नावाखाली झाडं लावायला सांगितली. बंधार्‍यानं पाणी आडवल्यानं शेतात सोन्यासारखं पीक येणारच ना. मी तुझीच आयडीया वापरली. राजाराम दादाची जागा खड्डयात हाय. आन वरच्या बाजूला उंचवटयावर सावकाराची विहिर हाय. गावाच्या मदतीने सावकाराच्या विहिरीपेक्षा खोलवर विहिर खोदल्यावर त्याच्या विहिरीतलं पाणी गावच्या विहिरीत येणारच ना! या दुष्काळाच्या आणि सावकाराच्या जाचातून गाव सोडविण्यासाठी गावच्या एकीची आन् आपल्या सारख्या हुशार माणसांची गरज असते.’’ दोघेही हसत घराकडं जातात.

कथालेखक : प्रा. डॉ. आर. डी. शिंदे

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com