समज देण्यासाठी गेलेल्या दोघा पोलिसांना केली मारहाण; गुन्हा दाखल
स्थानिक बातम्या

समज देण्यासाठी गेलेल्या दोघा पोलिसांना केली मारहाण; गुन्हा दाखल

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक। प्रतिनिधी

तक्रार दाखल असलेल्या संशयितास समज देण्यास गेलेल्या पोलीसांना लाकडी दांडक्याच्या सहाय्याने बापलेकांनी मारहाण केल्याची घटना पेठरोडवरील तवलीफाटा जकात नाका येथे शनिवारी (दि.25) दुपारी घडली.

बापुराव उर्फ भास्कर काकड (44) व बाळकृष्ण बापुराव काकड (24, रा. दोघेही काकडमळा, नवीन जकात नाका, पेठरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरिक्षक भाऊसाहेब कारभारी शेळके (52) यांनी तक्रार दाखल केली आहे.

शेळके हे मखमलाबाद पोलीस चौकीत कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका अदखलपात्र गुन्ह्यातील संशयित असलेल्या बापुराव काकड यास समज देण्यासाठी शेळके आपल्या सहकार्‍यांसह संशयिताच्या घरी गेले होते.

समज दिल्याचा राग आल्याने बापुराव काकड व त्याचा मुलगा बाळकृष्ण यांनी लाकडी दांडक्यांनी शेळके व त्यांच्या सहकार्‍यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com