नाशिकची करोना टेस्टिंग लॅब आता आयडी पासवर्डच्या प्रतीक्षेत; ‘एनएबीएल’चीही परवानगी मिळाली
स्थानिक बातम्या

नाशिकची करोना टेस्टिंग लॅब आता आयडी पासवर्डच्या प्रतीक्षेत; ‘एनएबीएल’चीही परवानगी मिळाली

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यात कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी नाशिक मध्ये करोना विषाणू टेस्टिंग लॅब सुरू करण्यात यावी अशी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. यानंतर स्थानीक नेते आणि प्रशासनाकडून याबाबतचे प्रयत्न सुरु झाले.

अखेर एम्सकडून या लॅबला परवानगी देण्यात आली. गेल्या आठवड्यात ही लॅब सुरु होणार असल्याचे चर्चा होती मात्र, लॅबला एनएबीएलची मान्यता मिळवणे देखील अनिवार्य करण्यात आल्यामुळे काहीसा विलंब झाला होता. आज या लॅब ला एनएबीएलची मान्यता प्राप्त झाली असून आयसीएमआर कडून युजरनेम व पासवर्ड मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.

नाशिकमध्ये करोना विषाणू टेस्टिंग लॅब सुरु करण्यासाठी आय.सी.एम.आर कडून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नाशिकमधील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज मधील लॅबची पाहणी करण्यात आली होती. यासाठी आवश्यक यंत्रसामग्री जिल्हा प्रशासनाकडून दातार जेनेटिक्सकडून उपलब्ध करून देण्यात आली होती.

करोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज,पुणे या लॅबची मदत घ्यावी लागत असल्याने चाचणी अहवाल येण्यामध्ये अधिक वेळ जात आहे. नाशिकमध्ये करोना तपासणी लॅबला परवानगी मिळावी यासाठी सर्वत्र मागणी केली जात होती.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने लॅबच्या परवानगीचे अधिकार पुणे आणि नागपूर केंद्राला दिले आहेत. त्यानुसार आय.सी.एन.आर च्या अधिकाऱ्यांनी मविप्र येथील मेडिकल कॉलेजच्या लॅबची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाहणी केली होती. या प्रयोगशाळेसाठी अतिरिक्त आवश्यक यंत्रसामुग्री नाशिकच्या दातार लॅब येथून उपलब्ध होणार आहेत.

तसेच यासाठी लागणाऱ्या मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञांना नागपूर येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेऊन हे तज्ञ लवकरच नाशिक येथे येणार असून लवकरच मविप्र मेडिकल कॉलेज येथील कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, लॅबच्या परवानगीसाठी एनएबीएल या संस्थेची   परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले होते.

आज ती परवानगी मिळाली असून आता आयसीएमआर कडून युजरनेम व पासवर्ड मिळण्याची प्रतीक्षा असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले. आज दिवसभरात ही कार्यवाही पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न असून लवकरात लवकरच टेस्टिंग नाशिकमध्ये होण्यास प्रारंभ होणार आहे. टेस्ट साठी लागणारे किट्स आपण याआधीच उपलब्ध करून घेतले असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com