Video : नाशिककरांना दिलासा; पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाला डिस्चार्ज
स्थानिक बातम्या

Video : नाशिककरांना दिलासा; पहिल्या कोरोनामुक्त रुग्णाला डिस्चार्ज

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित असलेल्या आणि यशस्वी उपचार करून कोरोनामुक्त झालेल्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील रुग्णाला आज नाशिक जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, सिव्हील सर्जन डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह अनेक अधिकारी डॉक्टर्स आणि जिल्हा रुग्णालयाचे आरोग्य सेवक उपस्थित होते.

तालुक्यातील लासलगाव जवळच्या पिंपळगाव नजीकचा येथील युवक कोरोनामुक्त झाला आहे. त्याचा कोरोनाचा तिसरा अहवालही शनिवारी (दि.११) रात्री निगेटिव्ह प्राप्त झाला होता. त्यानंतर दोन दिवस रुग्णालयात ठेवून त्यास आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी या रुग्णाशी चर्चा करत यापुढे काळजी घेण्याचे आवाहन केले.

नाशिक जिल्ह्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पिंपळगाव नजीक येथे २५ मार्च रोजी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता तर त्याचदिवशी त्याचे स्वब तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्याचे अहवाल २७ मार्च राजी पॉझिटिव्ह आले होते. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण त्याच्या रुपाने आढळाला होता.

१४‍ दिवस त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याचा दुसरा स्वब निगेटिव्ह प्राप्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला होता. तर १५ व्या दिवसाच्या स्वबचे अहवालही शनिवारी प्राप्त झाला असून तोही निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला होता.

त्यानंतर जिल्हा रुग्णालयाकडून त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.  हा जिल्ह्यातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण होता आणि कोरोना मुक्त होणाराही तोच जिल्ह्यातील पहिला रुग्ण ठरला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com