Thursday, April 25, 2024
Homeनाशिककोणतेही संकट हे कायमस्वरुपी नसते – जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची विशेष मुलाखत

कोणतेही संकट हे कायमस्वरुपी नसते – जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची विशेष मुलाखत

नाशिक | कुंदन राजपूत

कधीतरी असे प्रसंग येतात की, ज्यामध्ये तुमची क्षमता पणाला लागते. आजवरच्या अनुभवातून मला हे जाणवले की कोणतेही संकट हे कायमस्वरूपी नसते.मी पूर्णतः सकारात्मक आहे. हा काळ देखील लवकरच निघून जाईल, या शब्दात करोना संकटात नाशिककरांची कुटूंबाप्रमाणे काळजी घेणारे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विश्वास व्यक्त केला. दै.देशदूतने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

- Advertisement -

1। तुमचे दैंनदिन कामाचे स्वरुप कसे आहे?

सध्या माझा बहुतांश वेळ मोबाईलवर जात आहे. कार्यालय जवळपास बंद असल्याने बैठका सुद्धा डिजिटल घेत आहोत. सकाळी सहा-सात वाजल्यापासूनच फोन सुरू होतात. दिवसभरामध्ये लॉक डाऊन अंमलबजावणीची माहिती घेणे, ज्या अत्यावश्यक बाबींना सुट दिली आहे ती प्रकरणे निकाली काढणे,  नागरिकांना सुविधा देण्यासाठी काय काय करता येईल यासाठी स्वयंसेवी संस्था आदिंशी चर्चा करणे, अशाप्रकारे रात्री उशिरापर्यंत काम  सुरु असते.

2। येणार  ताण कसा हातळता ?

ताण विशेष जाणवत नाही.कधीतरी असे प्रसंग येतात की ज्या मध्ये तुमची क्षमता पणाला लावण्याची तुम्हाला संधी मिळते. आजवरच्या अनुभवातून मला हे जाणवले की कोणतेही संकट हे कायमस्वरूपी नसते. आपण आपले काम मनापासून केले तर संकटाशी सामना करता येतो.

3। सगळीकडे चिंतेचे वतावरण  असताना सकारात्मकता कशी बाळगता ?

– ज्यांच्यावर जबाबदारी जास्त असते त्यांनी स्वतःचे व इतरांचे मनोधैर्य टिकून ठेवणे अत्यावश्यक असते. तुम्ही विचार कसा करता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. योग्य नियोजन केले तर कठीण परिस्थितीवर देखील मात करता येते हे मी माझ्या सेवेत अनेक वेळा अनुभवलेले आहे. मी पूर्णतः सकारात्मक आहे आणि हा काळ लवकरच निघून जाईल याची मला खात्री आहे.

4। तुमचे कुटुंबीय  ही परिस्थिती कशी हाताळतात ?

– माझी पत्नी, मुलगी तसेच आई व सासू-सासरे आम्ही सर्वजण बरोबर आहोत. त्या सर्वांना देखील परिस्थिती बाबत सर्व माहिती आहे. त्यामुळे माझ्या दिनक्रमामध्ये ते देखील पूर्णतः सहयोगी आहेत व त्यांच्यामधील सकारात्मकता मला ऊर्जा देते.

5। तुम्हाला कोणाचा आधार वाटतो ? 

– मला सुरवातीपासूनच वाचण्याची आवड आहे.  फिलॉसॉफी, इतिहास विविध मोठ्या व्यक्तींची आत्मचरित्र याचे वाचन आधी केलेले आहे. त्यामुळे मला विशिष्ट अशा व्यक्तीचा नव्हे तर या सगळ्यातून माझ्या स्मरणात राहिलेल्या अनेक चांगले प्रसंग व वाक्यांचा आधार वाटतो.

6। जबाबदारीचे भान, बदलणारी परिस्थिती, नियोजनाचा भार, हे गणित कसे सांभाळतात ?

–  या संकटाचा मुकाबला करणे हेच सगळ्यांच्या समोरील आव्हान आहे. जिल्ह्यामध्ये काय काय काम सुरू आहे याचा साधारणपणे अंदाज घेणे. विविध वाहिन्या तसेच वृत्तपत्रे यामध्ये या विषयावरती लिहून येणारी महत्वपूर्ण माहितीचे अवलोकन  व त्यानुसार आपल्या जिल्ह्यासाठी सर्वोत्तम ठरेल अशा गोष्टी करीत जाणे हे काम गेले महिना दीड महिन्यापासून सुरू आहे.

७) सहकाऱ्यांची, कुटुंबाची काळजी कशी घेतात ?

– काळजी वाटण्यापेक्षा व्यवस्थित काळजी घेणे ही गोष्ट मला अधिक गरजेचे वाटते. कार्यालयातील जवळपास 95 टक्के कर्मचाऱ्यांना मी सुट्टी दिलेली आहे. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा कार्यालयांमध्ये कमीत कमी वेळ थांबून बहुतांश काम प्रत्येकाने आपल्या घरूनच करावे अशा सूचना दिल्या आहेत. आम्ही बाहेरील व्यक्तीचा संपर्क जवळजवळ बंद केला आहे.

8। तुम्हाला कामासाठी प्रेरणा कोठून मिळते ?

– रुटीन काम तर कुणीही करु शकते. परंतु कधीतरी अशी वेळ येते ज्यावेळी तुमची पूर्ण क्षमता पणाला लागते. तसेच समाजासाठी काहीतरी मोठे करण्याची संधी तुम्हाला मिळते. वास्तविक प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांचे कामा मागे हीच प्रेरणा असते. आता आलेले संकट हे तर खूपच मोठे असल्यामुळे त्यावर मात करून मिळणारे समाधान देखील तितकेच मोठे असणार आहे.

9। प्राणायाम, योगा, जेवणाची वेळ काशी सांभाळता ?

– सध्या कार्यालयीन कामकाज हे एकाच विषयाभोवती केंद्रित झालेले असल्यामुळे उलट वेळेचे नियोजन करणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे वरील सर्व गोष्टी त्या-त्या वेळेला करण्याकरता वेळ मिळत आहे.

10। कामासाठी एनर्जी व उत्साहाचे रहस्य काय ?

– केवळ नियमित कामे करण्यापेक्षा काहीतरी नावीन्यपूर्ण करण्याकडे माझा नेहमीच कल राहिलेला आहे. त्यातूनच सेवा हमी कायदा व्हाट्सअप ग्रिवन्स सेल वगैरेसारख्या गोष्टी आपण करु शकलो. एखादी गोष्ट आपण योग्य प्रकारे प्लॅन करतो व प्रत्यक्षात अमलात येते व त्यामुळे व्यवस्थेवर दुरगामी सकारात्मक परिणाम होतो ही गोष्ट अत्यंत आनंददायक आहे आणि तीच माझ्या कामामागील महत्त्वाची प्रेरणा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या