श्वसननलिकेत अडकले एक रुपयाचे नाणे; सुरगाण्यातील नऊ वर्षीय पायलला दिले जीवदान
स्थानिक बातम्या

श्वसननलिकेत अडकले एक रुपयाचे नाणे; सुरगाण्यातील नऊ वर्षीय पायलला दिले जीवदान

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

श्वसननलिकेत अडकलेले एक रुपयाचे नाणे यशस्वीपणे बाहेर काढून नाशिक जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम अवळपाडा येथील नऊ वर्षीय बालिकेला जीवनदान दिले आहे. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अवघड शस्रक्रीया करून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

अधिक माहिती अशी की, सुरगाणा तालुक्यातील अवळपाडा येथील नऊ वर्षीय पायल अशोक वराडे हिने काल( दि.७) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरी खेळत असताना एक रुपयाचे नाणे तोंडावर ठेवले होते. यादरम्यान तिच्याकडून नकळतपणे ते घशात जाऊन अडकले होते.

पायलला यानंतर प्रचंड त्रास होऊ लागला. तिला खोकला, उलटी व श्र्वास घेण्यासाठी अडचणी येत होत्या. यावेळी घाबरलेल्या पालकांनी त्वरित सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात तिला उपचारासाठी नेले.

या रुग्णालयात कान, नाक घसा विशेष तज्ञ नसल्याने रुग्णास इतर खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, येथील डॉक्टरांनी पायलची परिस्थिती बघून असमर्थता दाखवली.

यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी नाशिक जिल्हा रुग्णालयात मध्यरात्री.साडेबारा वाजेच्या सुमारास आणले. यावेळी कर्तव्यावर हजर असलेले कान, नाक, घसा विशेषज्ञ डॉ. संजय गांगुर्डे व डॉ. शेळके यांनी त्वरित एक्सरे तपासणी करून रुग्णाची तपासणी केली.

यावेळी श्वसननलिकेत नाणे अडकले निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ कर्तव्यावर असलेले भुलतज्ञ डॉ. वलावे व डॉ गाडेकर यांना याबाबतची माहिती दिली.

मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास डॉ. गांगुर्डे व डॉ शेळके यांनी दुर्बिणीद्वारे श्वसननलिकेतील नाणे Laryngoscopy च्या सहाय्याने पायलला जीवनदान दिले. पायल बोलू लागल्याने कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कुटुंबीयांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आभार मानले. पायल ही धोक्याच्या बाहेर असून बाल कक्ष जिल्हा रुग्णालयात तिचे पुढील उपचार चालू आहेत.

नाशिक जिल्हा रुग्णालयात अनेक गंभीर ५० ते ५५ प्रकारच्या रुग्णांवर तात्काळ उपचार दिले असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे यांनी कान नाक घसा विशेषज्ञ डॉ. संजय गांगुर्डे , भूल तज्ञ डॉ वळवे, डॉ. गाडेकर, व ऑपरेशन स्टाफ तेजस कुलकर्णी व अतुल पवार यांचे अभिनंदन केले. 

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com