कॅमेरे व एनएसए अ‍ॅपमुळे सराफा बाजाराची सुरक्षितता वाढणार
स्थानिक बातम्या

कॅमेरे व एनएसए अ‍ॅपमुळे सराफा बाजाराची सुरक्षितता वाढणार

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । सीसीटीव्ही कॅमेरा हे प्रभावी अस्त्र आहे. कॅमेरे व एनएसए अ‍ॅपमुळे सराफा बाजाराची सुरक्षितता वाढणार आहे. नाशिकमधील सराफ व्यवसाय नीतीमत्तेनुसार 90 टक्के आहे, हे आश्वासक आहे. पोलीस तपासासाठी सराफ बाजारातील कॅमेर्यांचे सिक्रोनायझेशन केले जाणार आहे. कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्यांचा प्रतिबंध होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केला.

सराफ बाजारातील सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेली सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षा प्रणाली व एनएसए अ‍ॅप सुरक्षा यंत्रणेचा लोकार्पण सोहळा आज सकाळी सराफ असोसिएशन हॉलमध्ये झाला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते सीसीटीव्ही स्क्रीन व एनएसए अ‍ॅपव्दारे सायरन वाजवून अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव, पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, विजयकुमार पन्हाळे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर आदी उपस्थित होते.

सराफ असोसिएशनचे राजेंद्र दिंडोरकर म्हणाले, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी कैद केलेली दृश्य गुन्हे तपासासाठी ग्राह्य धरली जावीत. कलम 411 नुसार पोलीस व सराफांमध्ये समन्वय असला पाहिजे. अधिकृतपणे सोन्याच्या भावाप्रमाणे रक्कम दिली असेल तर संबंधित सराफाला त्रास देवू नये. कलम 411 नुसार सराफांसाठी सहसंघनमत हा शब्द लागू करु नये. गुन्ह्याचा तपास करताना तपास अधिकारी व रिकव्हरी अधिकारी असावा. सराफा बाजारातील 90 टक्के व्यापारी पावतीनुसार सोने खरेदी व विक्री करत आहेत.

सराफ बाजार 36 कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. कॅमेरा तीन मेगापिक्सल व सहा एमएम लेन्सचा आहे. त्याची रेकॉर्डिंग क्षमत 72 हजार जीबी आहे. 64 कॅमेर्यांची यंत्रणा असून गरजेनुसार कॅमेर्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. सहा महिन्यांचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. वीजप्रवाह सेंट्रलाइज पद्धतीने आहे. वीज नसतानाही कॅमेरे चालू राहणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेर्याची स्क्रीन सराफ असोसिएशन कार्यालय व सरकारवाडा पोलीस ठाण्यात असणार आहे. ही यंत्रणा सन इलेक्ट्रॉनिक सिस्टीमतर्फे बसविण्यात आली आहे. सराफ बाजारात येणारा प्रत्येक व्यक्तीचे फेशियल डिटेक्शन व गाडीचा क्रमांक सीसीटीव्हीमध्ये कैद होणार आहे. एनएसए अ‍ॅपमध्ये पोलीस, नातेवाईक व सराफ व्यापार्‍यांची माहिती अपलोड करता येणार आहे. भारतातील एनएसए हे पहिलेच अ‍ॅप असल्याचा दावा सराफ असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे.

एनएसए अ‍ॅप
सराफ व्यापार्‍यांसाठी एनएसए (नाशिक सराफ असोसिएशन) या नावाचे मोबाईल बेस अ‍ॅप्लिकेशन लॉन्च करण्यात आले. त्यामध्ये पॅनिक बटन आहे. ते बटन तीन सेकंद दाबून धरताच 7 हजार 500 सराफ व्यापार्‍यांच्या मोबाईलमध्ये सायरन वाजणार आहे. त्यात संबंधित दुकानाचा फोटो, सराफ व्यापार्याचे नाव, मोबाईल क्रमांक दिसणार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन बी टु बी पध्दतीने सराफ व्यापार्यांना देण्यात आले आहे. तसेच दुकानात पॅनिक बटन बसविण्यात येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com