बापरे! नाशिक शहरात गेल्या नऊ दिवसात करोना रुग्णांची संख्या ‘तिप्पट’

बापरे! नाशिक शहरात गेल्या नऊ दिवसात करोना रुग्णांची संख्या ‘तिप्पट’

अतिजोखमीच्या व्यक्ती 32 वरुन 156 ; प्रतिबंधीत क्षेत्र 6 वरुन 26

नाशिक । प्रतिनिधी

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील आणि राज्यातील रुग्णाची संख्या वाढत असल्याने या साथीची भीषणता समोर येऊन लागली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात 1 मे रोजी 10 असलेला बाधीत रुग्णांचा आकडा शनिवारी (दि.9) 39 पर्यत जाऊन पोहचला आहे. शहरात गेल्या 9 दिवसात करोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या व्ंयक्तींची संख्या 32 वरुन 156 आणि कमी जोखमीच्या व्यक्तींची संख्या 186 वरुन 616 पर्यत जाऊन पोहचली आहे. यावरुन नाशिक नगरीत करोनाचा प्रभाव हा धोकादायक वळणार पोहचला आहे. यामुळे आता सामाजिक अंतराची तमा न बाळगणार्‍या नाशिककरांसाठी हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी देश पातळीवर मोठ्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. मात्र ज्या संख्येने रुग्णांची संख्या वाढत आहे, हे पाहता आता नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता तज्ञांकडुन वर्तविली जात आहे.

नाशिक शहरात पहिला रुग्ण 6 एप्रिल रोजी आढळून आला होता. दिल्लीवरुन प्रवास करुन गोविंदनगर (मनोहरनगर) याठिकाणी आपल्या घरी आल्यानंतर या व्यक्तीला त्रास झाल्यानंतर प्रवाससंपर्कात त्यास बाधा झाल्याचे समोर आले होते.

त्यानंतर चार दिवसात आणखी दोन रुग्ण आढळून आल्यानंतर यातील एक जण परदेशातून आलेला असल्याचे आणि दुसरा मुंब्रा (ठाणे) येथून आल्याचे समोर आले होते. नंतर मुंबईतून उत्तरप्रदेशात जात असलेल्या युवकाला निवारा गृहात ठेवल्यानंतर आणि एक वृध्देला तिची मुले करोना बाधीत ठिकाणावरुन आल्यामुळे झालेल्या संपर्कातून बाधा झाल्याचे समोर आले.

नंतर या वृद्देच्या घरातील चौघे अशांना संपर्कातून करोना झाल्याचे समोर आले. ठाणे येथे सुरक्षा रक्षक कामाला असलेला नंतर भंडारा जिल्ह्यातील गावी परततांना नाशिकरोड येथे आढळून आलेल्या व्यक्तीस करोना झाल्याचे समोर आले होते. 26 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टराला संसर्ग झाल्याचे समोर आले होते.

अशाप्रकारे 6 ते 26 एप्रिले 2020 या 21 दिवसात शहरात अवघे 10 रुग्णच आढळून आले होते आणि शहरात केवळ 6 प्रतिबंधीत क्षेत्र झाले होते. पुढे 27 एप्रिल ते 1 मे 2020 या पाच दिवसात एकही रुग्ण आढळून आला नसल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला होता.

मात्र, 1 मे रोजी शहरातील 10 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 32 व्यक्ती अति जोखमीच्या आणि 186 व्यक्ती कमी जोखमीच्या होत्या. परंतु 2 मे रोजी अगोदरच्या बाधीत रुग्णांच्या संपर्कातील 13 रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. यामुळे अति जोखमी आणि कमी जोखमीच्या व्यक्तींचा आकडा वाढत गेला.

तर 1 मे रोजी शहरात बाधीतांचा 10 आकडा असतांना तो 9 मे पर्यत 39 पर्यत जाऊन पोहचला असल्याने नऊ दिवसात करोना बाधीतांची संख्या तिप्पट झाली आहे. तर 1 मे रोजी शहरात अवघे 6 प्रतिबंधीत क्षेत्र असतांना 9 मे पर्यत हा आकडा 26 पर्यत जाऊन पोहचला आहे.

यावरुन करोना रुग्णांचा वाढती आकडेवारी नाशिककरांसाठी धोकादायक बनत चालली आहे. लॉकडाऊनच्या काळात घरात बसा आणि सुरक्षित रहा या मौलीक मंत्राकडे दुर्लक्ष करुन घराबाहेर पडणार्‍यांकडुन सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे याची किंमत नागरिकांना चुकवावी लागत आहे. अशाच प्रकारे करोना बाधीतांचा आकडा वाढत गेल्यास काही दिवसांनी संपुर्ण नाशिक शहराचे रुपांतर प्रतिबंधीत क्षेत्र होण्यास वेळ लागणार नाही.

शहरातील प्रतिबंधीत क्षेत्राची स्थिती

  • शहरातील 26 भागात प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर.
  • प्रतिबंधीत क्षेत्रात असलेली एकुण घरे – 4,463.
  • प्रतिबंधीत क्षेत्रात असलेली लोकसंख्या – 16,861
  • प्रतिबंधीत क्षेत्रात कार्यरत वैद्यकिय पथके – 78
  • एकुण बाधीत रुग्ण – 39 (1 आरोग्य सेवक व 3 मनपा बाहेरील)

पोलीसांनंतर डॉक्टरांना बाधा…

नाशिक ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी, राज्य राखीव पोलीस, आरोग्य सेवक अशांना मोठ्या संख्येने करोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील मालेगांव याठिकाणी करोनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी गेलेल्या 70 च्यावर पोलीस कर्मचार्‍यांना करोना संसर्ग झाला असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहे. यानंतर जिल्हा शासकिय रुग्णालयातील एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर, दोन जेष्ठ डॉक्टर, तसेच शहरातील खाजगी रुग्णालयातील दोन डॉक्टर अशा एकुण पाच डॉक्टरांना बाधा झाली असुन एक फार्मासिस्ट व एक पत्रकाराला करोना झाला आहे.

महापालिका करोना एकुण अहवाल

अ. न. तपशिल आजपर्यत प्रगतीपर         9 मे स्थिती

1. एकुण नमुना तपासणी 811                      16
2. निगेटीव्ह नमुने 764                               69
3. पॉझिटीव्ह मनपा 0                                 39
4. पॉझिटीव्ह आरोग्य सेवक 4                        0

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com