खुशखबर : नांदूरी ते वणीगड होणार ‘रोप-वे’
स्थानिक बातम्या

खुशखबर : नांदूरी ते वणीगड होणार ‘रोप-वे’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

प्रतिनिधी । नाशिक

फ्युनिक्युलर ट्राॅलीनंतर आता साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्तीपीठ असलेल्या वणी येथील सप्तशृंगी गडावर रोप-वेची निर्मिती होणार असून हा रोपवे नांदूर ते सप्तश्रृंगी गड असा उभारला जाणार आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील इतर चार ठिकाणीही पर्यटनाला चालना देण्यासाठी रोप -वे ची निर्मिती करण्यासाठी प्रशासकीय हालचाली गतीमान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्याला ऐतिहासिक मोठा वारसा लाभला आहे. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे तर नाशिकचे नाव सातासमुद्रापार गेले आहे.

जगभरातील पर्यटकांचा जत्था नाशिकला येण्यासाठी सज्ज असतो. नाशिक जिल्ह्यात ७२ लहान मोठे गडकिल्ले आहेत.  त्यामुळे डोंगरांवर रोप -वे ची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये वणी येथील नांदूरी ते सप्तश्रृंगी गडावर त्याची निर्मिती होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्यापासून ते गंगाद्वारपर्यंत, मांगीतुंगी डोंगर, हतगड किल्ला, सप्तश्रृंगी गड ते मार्केंडे डोंगर, या ठिकाणीही निर्मिती करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी देशदूतला दिली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com