रानवडचा मंडळ अधिकारी लाच स्विकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात
स्थानिक बातम्या

रानवडचा मंडळ अधिकारी लाच स्विकारताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

शेतातील रस्ता खुला करून देण्यासाठी मंडळ अधिकारी शैलेंद्र कृष्णराव शिंदे (वय ५१, रा. मखमलाबाद रोड नाशिक) यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडून २० हजार रुपये लाचेची मागणी केली व ती पंचांच्या समक्ष स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास रंगेहाथ अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे तक्रारदार शेतकऱ्याची जमीन आहे. जमिनीचा रस्ता खुला करून देण्यासाठी तालुक्यातील रानवड येथील मंडळ अधिकारी शैलेंद्र शिंदे याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी काल (दि. १०) रोजी केली होती.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून मंडळ अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांनी सापळा रचला.   यावेळी सापळा पथकात पोलीस निरीक्षक प्रशांत सपकाळे, उज्वल पाटील, पोलीस नाईक प्रकाश महाजन, बाविस्कर, एसीबी चालक दाभोळे यांचा समावेश होता.

त्यांनी यशस्वी सापळा रचून पंचांच्या समक्ष लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी शिंदे यास रंगेहाथ ताब्यात घेतले. यावेळी संशयिताचे हॅश व्हॅल्यू घेण्यात आले आहेत. तसेच छायाचित्रदेखील घेण्यात आल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com