…तरीही मी तेव्हा पैंज लावली नसती; नाशिकमधील 25 लाख स्कॉर्पिओच्या उत्पादनावर आनंद महिंद्रांचे ट्विट
स्थानिक बातम्या

…तरीही मी तेव्हा पैंज लावली नसती; नाशिकमधील 25 लाख स्कॉर्पिओच्या उत्पादनावर आनंद महिंद्रांचे ट्विट

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

नाशिकमधील महिंद्रा कंपनीने नुकताच एकट्या स्कॉर्पिओ वाहनाचा 25 लाखांचा टप्पा पुर्ण केला. नाशिकच्या टीमने केलेल्या कामगिरीची दखल कंपनीचे सर्वेसर्वा आणि प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी घेतली. जेव्हा स्कॉर्पिओचे उत्पादन सुरु केले, तेव्हा नाशिकमध्ये असे काही होऊ शकते असे कुणी सांगितले असते तरीही मी पैंज लावली नसती असे म्हणत त्यांनी ट्विटरवरुन नाशिकच्या टीमला अनोख्या शुभेच्छा दिल्या.

नाशिकमधील सातपुर औद्यागिक वसाहतीत महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा लिमिटेडचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची वाटचाल 1981 या वर्षामध्ये सुरू झाली. हा प्रकल्प एकूण 147 एकरांमध्ये विस्तारलेल्या क्षेत्रामध्ये सुरू झाला. त्यावेळी प्रकल्पाची उत्पादन क्षमता दोन लाख 10 हजार इतकी होती. एफजे मिनी बस हे पहिले वाहन तयार केल्यानंतर या प्रकल्पाने दररोज 8 वाहनांचे उत्पादन करण्यास सुरुवात केली होती. आज, अ‍ॅसेम्ब्ली लाइनमध्ये दररोज 700 वाहनांचे उत्पादन केले जाते आणि ही वाहने जगभरातील 34 हून अधिक देशांमध्ये पोहोचली आहेत.

स्कॉर्पिओेच्या 25 वर्षांपुर्वी सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये 25 लाखाव्या वाहनाची नुकतीच निर्मिती करण्यात आली. यावेळी नाशिकमधील कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी कामगारांसह आनंदोत्सव साजरा केला.

याबाबतचे ट्विट महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे उत्पादन प्रमुख विजय कालरा यांनी केले होते. यानंतर कालरा यांच्या ट्विटला आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, 25 वर्षापुर्वी स्कॉर्पिओच्या उत्पादनावेळी ‘जर कुणी नाशिकचा हा प्रकल्प 25 लाखांचा टप्पा पार करेल असे भविष्य कथन केले असते तरीही मी पैंज लावली नसती कारण तेव्हा तो आत्मविश्वास नव्हता. नाशिकच्या संपुर्ण टीमने खुप चांगली कामगिरी केली आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा महिंद्रा यांनी ट्विटरवर दिल्या.

नाशिकच्या या प्रकल्पामध्ये सध्या स्कॉर्पिओ, मराझ्झो, एक्सयूव्ही 300, बोलेरो, ई-व्हेरिटो, अ‍ॅम्ब्युलन्स यांच्यासह विविध महिंद्रा उत्पादनांची निर्मिती केली जाते.

अनेक पुरस्कारांनी नाशिक महिंद्राचा गौरव

आतापर्यंत या प्रकल्पास ‘आयएमइए ‘फ्युचर रेडी फॅक्टरी’ पुरस्कार, टीपीएम ‘कन्सिस्टन्सी’ पुरस्कार, एमपीसीबी ‘वसुंधरा’ पुरस्कार, हेल्दी वर्क प्लेस : मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्ससाठी प्लॅटिनम लेव्हल अवॉर्ड आणि टीपीएम जेआयपीएमकडून ‘एक्सलन्स अवॉर्ड’ने महिंद्रा कंपनीचा सन्मान करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com