नवरदेव मोटरसायकलीवर आला आणि लग्न लावून नवरीला घेवून गेला
स्थानिक बातम्या

नवरदेव मोटरसायकलीवर आला आणि लग्न लावून नवरीला घेवून गेला

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

अडावद ता.चोपडा येथील नवरदेवाने स्वतः मोटरसायकलीवर बोरद येथे येवून विवाह समारंभ आटोपून नवरीमुलीला डबलसिट आपल्या घरी नेले. अत्यंत साध्या पद्धतीने उरकलेल्या या विवाह समारंभाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

बोरद येथील शिंपी समाजाचे नेते व भाजपाचे कार्यकर्ते किशोर रमण जाधव यांची कन्या मयुरी किशोर जाधव हिचा विवाह अडावद ता.चोपडा (जि.जळगाव) येथील भास्कर महारु बिरारे यांचे चि.महेश भास्कर बिरारे यांच्याशी दि.2 मे रोजी घटीक मुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता.

मात्र, 23 मार्चपासून देश लॉकडाऊन झाल्यामुळे राज्यबंदी, जिल्हाबंदी आहे. कलम 144 नुसार पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. लग्न समारंभासाठीदेखील शासनाने नियमावली तयार केली आहे. लग्नासाठी वधुवराकडील फक्त चार चार व्यक्तींना लग्नात सहभागी होण्यास परवानगी आहे.

त्याही प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असून स्थानिक सरपंच, ग्रामसेवकांच्या उपस्थितीत लग्न लावले जातील, असे निर्देश आहेत. परंतू अडावद येथील महेश बिरारे यांनी गावाच्या परवानगीने एकटेच मोटरसायकलीने बोरद येथे येवून लग्न समारंभ एकटयानेच आटोपून घेतला.

लग्नानंतर मोटरसायकलीवर बसवून तो वधुला घेवूनही गेला. येथील पुण्यपावन मंदिरात सरपंच वासंतीबाई ठाकरे यांच्या उपस्थितीत 2 मे रोजी सकाळी 11 वाजता हा विवाह समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी सामाजिक अंतर ठेवण्यात आले.

वधुवरांसह उपस्थित वर्‍हाडींनी तोंडाला मास्क बांधून शासनाच्या आदेशाचे पालन केले. यावेळी ब्राम्हण, न्हावी, मुलीचे आईवडील, काका, काकू, आजोबा, पं.स.सदस्य विजयसिंग राणा असे 11 लोक उपस्थित होते. लग्नानंतर 11 जणांनी जेवण केले. त्यामुळे बोरद गावाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे विवाह समारंभ झाल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com