नंदुरबार : आष्टे येथील महिलेला करोनाची लागण
स्थानिक बातम्या

नंदुरबार : आष्टे येथील महिलेला करोनाची लागण

Balvant Gaikwad

                     करोनाची ग्रामीण भागाकडे वाटचाल

तालुक्यातील आष्टे येथील ६८ वर्षीय महिला कोरोनाबाधीत आढळून आली आहे. यासोबतच जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या वीस झाली आहे. मात्र, यापैकी ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाची वाटचाल आता शहरीभागातून ग्रामीण भागाकडे होतांना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

तालुक्यातील आष्टे येथील ६८ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. सदर महिला ही बोरद ता.तळोदा येथील आहे. ती आपल्या कन्येकडे आष्टे (ता.नंदुरबार) येथे दोन महिन्यांपासून आली होती. तिला न्युमोनीयासदृष्य आजार असल्याने तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे तिच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे.

त्यामुळे जिल्हयातील कोरोना रुग्णांची संख्या आता २० झाली आहे. यात शहादा येथील ९, नंदुरबार तालुक्यातील ७, अक्कलकुवा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी नंदुरबार येथील चार व शहादा येथील एक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहादा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आतापर्यंत कोरोनाचे लोण शहरी भागात पसरले होते. परंतू गेल्या तीन दिवसात नंदुरबार तालुक्यातील नटावद व आष्टे येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने आता कोरोनाची वाटचाल शहरी भागाकडून ग्रामीण भागाकडे होतांना दिसून येत आहे.

त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. बाजारपेठेत विनाकारण व मास्कशिवाय फिरणे धोकेदायक ठरणार असल्याने नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com