Photo Gallery : ‘नांदूरमध्यमेश्वर’मध्ये यंदा पक्ष्यांचा मुक्काम वाढणार
स्थानिक बातम्या

Photo Gallery : ‘नांदूरमध्यमेश्वर’मध्ये यंदा पक्ष्यांचा मुक्काम वाढणार

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

‘रामसर’चा दर्जा प्राप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या, महाराष्ट्राचे भरतपूर अशी ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पक्ष्यांचा मुक्काम यंदा वाढणार आहे.  प्रजननकाळासह वाढती थंडी यामुळे  हा मुक्काम वाढणार असल्याचे बोलले जात आहे. यंदा मे महिन्याच्या अखेरपर्यंत परदेशी पाहुण्यांचे निरीक्षण करण्याची संधी अभ्यासकांना मिळणार असून, पर्यटकांसाठी देखील पर्वणी ठरणार आहे.

ऑगस्ट ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत नांदूरमध्येश्वरमध्ये ज्या पक्ष्यांनी अंडी घातली, त्यांची अंडी पर्जन्यवृष्टी आणि पूरस्थिमुळे वाहून गेली. पूरामुळे अनेक पक्ष्यांचे घरटे देखील वाहून गेल्याने, ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात पुन्हा प्रजनन झाले. पक्ष्यांच्या लांबलेल्या प्रजननकाळामुळे, त्यावेळी घातलेल्या अंड्यातील पिल्ले आता बाहेर पडू लागले आहेत.

त्यामुळे पक्ष्यांना यावर्षी अधिक काळापर्यंत अभयारण्यात थांबावे लागणार आहे. यासह सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे यंदा थंडीचा कडाका अधिक राहणार असल्याने, परदेशी पाहुण्यांचा मुक्कामही यंदा लांबणार आहे. सध्या पक्ष्यांची संख्या ३० हजारांच्या घरात असून, जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात ४० ते ४५ हजार पक्षी अभयारण्यात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अंडी घालणाऱ्या पक्ष्यांमध्ये नांदूरमध्यमेश्वरीची राणी समजली जाणारी जांभळी पाणकोंबडीसह स्पॉट बिलडक या पक्ष्यांचा सर्वाधिक समावेश आहे. सध्या ‘ब्लॅक विंग स्टील्ट, डार्टर, हुप्पू, फ्लेमिंगो, कॉमन कूट, रुडी शेल्डक, मार्श हॅरियर, ब्लू थ्रोट, नॉर्थन शोव्हलर, सायबेरीयन स्टोन चॅट, ग्रेटर स्पॉटेड ईगल’ यासह इतर परदेशी पाहुण्यांचे दर्शन पर्यटकांना होत आहे.

डिसेंबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत नांदूरमध्यमेश्वरमध्ये प्लेमिंगोची संख्या अवघी दोन ते तीन इतकची होती. मात्र, पाण्याच्या पातळीत झालेली घट आणि वाढलेली थंडी यामुळे फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ झाली असून, आठ ते दहा फ्लेमिंगो दृष्टीस पडत आहेत. यासह इतरही परदेशी पाहुण्यांची संख्या वाढू लागली असून, जानेवारीच्या अखेरीस नांदूरमध्यमेश्वरमध्ये परदेशी पक्ष्यांचे संमेलन पर्यटकांना अनुभवला मिळू शकते असा अंदाज पक्षीमित्रांनी सांगितला आहे.

छायाचित्रकार : संजोग कारंडे ( छायाचित्रकार हे ट्रेकर असून पक्ष्यांचे गाडे अभ्यासक आहेत)

Deshdoot
www.deshdoot.com