Thursday, April 25, 2024
Homeनाशिकतेजस पुरस्कार मुलाखत : अभ्यास आणि अनुभव हाच खरा गुरू- चेतन पाटील

तेजस पुरस्कार मुलाखत : अभ्यास आणि अनुभव हाच खरा गुरू- चेतन पाटील

नाशिक | प्रतिनिधी 

हॉटेल मॅनेजमेंटमध्ये उच्च शिक्षण,
कुटुंबातील पहिले उद्योजक, 
हॉटेल ग्रँड रिओचे व्यवस्थापकीय संचालक.

- Advertisement -

मस्कार, मी, तीन बहिणी, आई आणि बाबा असे आमचे पाच जणांचे कुटुंब. माझ्या तीनही बहिणी विवाहित आहे. मी सगळ्यात लहान. माझे वडील सरकारी नोकरीमध्ये होते. त्यामुळे त्यांच्या नोकरीनिमित्त आम्ही महाराष्ट्रभर फिरतीवर असायचो. त्यामुळे माझे बालपण वेगवेगळ्या ठिकाणी गेले. साधारण १९९३ मध्ये आम्ही नाशिकमध्ये आलो. सुरुवातीला मी नवरचना विद्यालयात आणि नंतर मराठा हायस्कूलमध्ये शिकलो. १० वीपर्यंत माझे मराठी माध्यमातून शिक्षण झालेले आहे. १०वी नंतर मी केटीएचएम कॉलेजमधून १२वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं.

माझे वडील इंजिनिअर होते, पण मला त्यात रस नव्हता. मला हॉटेल इंडस्ट्रीमध्येच करिअर करायचे होते. म्हणून पंचवटी कॉलेजमधून मी हॉटेल मॅनेजमेंटचा ३ वर्षांचा कोर्स केला. नंतर १ वर्ष अमेरिकेत आणि त्याच्या पुढचे वर्ष मुंबईमध्ये नोकरी करत होतो. आपण नोकरी किती वर्षे करणार, या विचाराने अस्वस्थ असायचो.

शेवटी नाशिकमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. नाशिकला परत आलो. इथे आल्यानंतर कॉलेजरोडला स्काय कॅफे सुरू केले. ते जवळ जवळ ३वर्षे सुरू होते. त्याच दरम्यान मी माझ्या हॉटेल ग्रँड रिओच्या प्रोजेक्टवर काम सुरू केले. २०१७ साली ते नाशिककरांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले. आजतागायत यशस्वीपणे ग्राहकांच्या सेवेत आहे.

या प्रोजेक्टसाठी मला बर्‍याच आव्हानांना सामोरे जावे लागले. एकतर आमच्या संपूर्ण कुटुंबात कोणीही उद्योजक नव्हते. मी पहिला उद्योजक आहे. त्यामुळे मला कोणाचे फारसे मार्गदर्शन नव्हते. मी व्यवसाय सांभाळू शकेन की नाही, याची घरच्यांना खात्री नव्हती. मला त्या गोष्टीला, सगळ्या आव्हानांना सकारात्मकपणे सामोरे जायचे होते आणि यशस्वी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. हे एकच ध्येय होते.

हा प्रोजेक्ट हाताळताना मला अडचणी देखील बर्‍याच आल्या. स्काय कॅफेचा अनुभव जरी गाठीशी असला तरीही एवढे मोठे हॉटेल सांभाळणे ही माझ्यासाठी छोटी गोष्ट नव्हती. अनेक चुका झाल्या. वेगवेगळे अनुभव आले. परंतु मी खचलो नाही. माझ्या घरच्यांची पूर्ण साथ होती. माझी संपूर्ण टीम माझ्या पाठीशी आहे. त्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे. आमच्यामध्ये मालक आणि सेवक असे नाते नसून आम्ही मैत्रिपूर्ण वातावरणात सगळे काम करतो. त्याची पावती आम्हाला ग्राहकांच्या हास्यातून, त्यांच्या समाधानातून नेहेमी दिसत असते.

या संपूर्ण प्रवासात मला चांगले वाईट सगळ्या प्रकारचे अनुभव आले. म्हणजे कॉलेजमध्ये शिकलेली थिअरी आणि प्रत्यक्षातले काम यात खूप मोठा फरक आहे. अनुभव आपल्याला खूप महत्त्वाचे धडे शिकवतात. ते चांगले आहेत की, वाईट ते महत्त्वाचे नसते. त्या धड्यातून आपण काय शिकतो ते जास्त महत्त्वाचे. पण चांगले अनुभव बरोबर घेऊन आपण चाललो तर काम करायला सतत उत्साह येतो.
या प्रोजेक्टच्या निमित्ताने माझ्या नाशिकमधल्या अनेक दिग्गज लोकांच्या ओळखी झाल्या. नवीन लोक भेटले. आपण एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येत आहोत, याचा कुठेतरी आनंद वाटतो. माझा आत्मविश्वासदेखील वाढतो.

या सगळ्याबरोबरच मला ट्रेकिंग आणि ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडते. शक्यतो दर रविवारी किंवा महिन्यातून दोन, तीन वेळा मी माझ्या ग्रुपबरोबर ट्रेकिंगला जातो आणि जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी ट्रॅव्हलिंगदेखील करतो. त्यामुळे पुन्हा काम सुरू करायला एक हुरूप येतो, नवीन ऊर्जा मिळते. आठवड्याचा शीण निघून जातो आणि पुन्हा नव्याने काम सुरू करायला मजा येते. कामाच्या व्यापातून जसा वेळ मिळेल तसे मी माझे छंद जोपासतो.

मी तरुणांना एवढेच सांगेन की, संपूर्ण विचार करून आपले करिअर निवडा. तुम्ही जे कराल त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून काम करा. त्यासाठी स्वतःचे १००% द्या, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. याच नव्हे तर कोणत्याही व्यवसायात येताना आधी त्याचा संपूर्ण अभ्यास करा.
माझ्या व्यवसायापुरते म्हणाल तर आपण आपल्या ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा कशी देऊ शकतो, त्यांच्या आवडीनिवडी, खाद्यपदार्थांची चव या सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेतली तर तुम्हीदेखील या क्षेत्रातले एक यशस्वी उद्योजक व्हाल.

- Advertisment -

ताज्या बातम्या