विषबाधेमुळे संगमनेरात बहिण-भावाचा मृत्यू

विषबाधेमुळे संगमनेरात बहिण-भावाचा मृत्यू

संगमनेर (प्रतिनिधी)-विषबाधेमुळे लहान बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संगमनेरातील आंबेडकरनगरमध्ये घडली. एकाच कुटुंबातील पाचजणांना विषबाधा झाल्याने त्यातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. तर आई आणि एका मुलीवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आंबेडकरनगरमध्ये राहणार्‍या दीपक सुपेकर कुटुंबियांच्या घरी पाच जणांना गुरूवारी जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी रात्री या कुटुंबाने एकत्रित जेवण केले. त्यानंतर काही वेळातच कृष्णा (वय 6), श्रावणी (वय 9), वैष्णवी (13), मंगल सुपेकर (मुलांची आई) तर आजी भागीरथी गंगाधर सुपेकर यांना मळमळ व उलट्यांचा त्रास होऊ लागला. काही वेळाने त्यांना बरे वाटले. मात्र शनिवारी सकाळी कृष्णाला त्रास होऊ लागल्याने त्यास शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

रविवारी सकाळी उपचार सुरु असतानाच कृष्णाचा मृत्यु झाला. तर श्रावणी व वैष्णवी यांनाही दुपारनंतर त्रास होऊ लागल्याने श्रावणीला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात तर वैष्णवी हिला संगमनेरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान सोमवारी सकाळी उपचार सुरु असताना श्रावणीचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान प्रवरा रुग्णालयातून संगमनेर शहर पोलिसांना मयताची खबर प्राप्त झाली.

या सगळ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. श्रावणी हिचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण समजेल असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयूब शेख यांनी मयताची आई हिचा जबाब घेतला आहे. मयताचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

वैष्णवी सुपेकर हि उलट्या, अतिसार आणि थंडीताप या आजारामुळे रुग्णालयात उपचार घेत असून कृष्णा आणि श्रावणी यांचा अतिसाराने मृत्यू झाला असावा मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल.
-डॉ. अतुल आरोटे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com