दिड लाखाच्या लाचेची मागणी; महावितरणचे दोन अभियंत्यांवर गुन्हे
स्थानिक बातम्या

दिड लाखाच्या लाचेची मागणी; महावितरणचे दोन अभियंत्यांवर गुन्हे

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पावर 135 केव्हीचे विद्युत रोहित्र (ट्रान्सफार्मर) व 95 इलेक्ट्रीक वीजमीटर देण्यासाठी तक्रारदाराकडून 1 लाख 65 हजार रुपयांची लाच मागणार्‍या महावितरण कंपनीतील दोघा अभियंत्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

महावितरणचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता कृष्णराव अरविंद श्रृृंगारे आणि सहायक अभियंता मंगेश प्रभाकर खरगे अशी दोघा संशयित लाचखोरांची नावे आहेत.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराने वीजमीटर व ट्रान्सफार्मर बसवून देण्यासाठी महावितरणकडे अर्ज केला होता. अहवाल मंजुर करण्याच्या मोबदल्यात कृष्णराव श्रृंगारे यांनी 1 लाख 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तसेच मंगेश खरगे यांनीही तक्रारदाराकडे 45 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारीची शहानिशा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला असता, इंदिरानगर येथील महावितरणच्या कक्ष कार्यालयात पंचासमोर संशयितांनी लाचेची मागणी केली. त्यामुळे विभागाने दोघांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लाचलूचपत विभागाने दोघांनाही अटक केले असून न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच दोघांच्याही घरांवर छापे टाकण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती. यामुळे त्यांच्याकडे किती मालमत्ता मिळाली हे स्पष्ट होऊ शकले नाही.

Deshdoot
www.deshdoot.com