वीज बिल वसुली : महावितरणमुळे शेतकरी सावकाराच्या दारात!
स्थानिक बातम्या

वीज बिल वसुली : महावितरणमुळे शेतकरी सावकाराच्या दारात!

Dhananjay Shinde

थकीत वीज बिलासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम; शेतकरी दुहेरी संकटात

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सर्वत्र बाजारपेठ बंद असल्याने शेती मालाची खरेदी-विक्रीही बंद असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत महावितरणने शेती पंपाच्या थकीत वीज बिलासाठी रोहित्र बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे वीज बिल भरण्यासाठी पैशाची तरतूद करण्यासाठी काही शेतकर्‍यांवर सावकाराच्या दारात जाण्याची वेळ ओढावली आहे. त्यामुळे महावितरणच्या या धोरणाबद्दल शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत असून पिकाला शेवटच्या पाण्याचा फटका बसून याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे.

खरीप हंगामातील पिके अतिवृष्टीने हातातून गेल्याने शेतकरी अगोदरच अडचणीत आहेत. यातून सावरत शेतकर्‍यांनी मोठ्या हिंमतीने रब्बीतील गहू, कांदा, ऊस यासह भाजीपाला व चारा पिके घेतली आहेत. यातील बहुतांशी पिकांना सध्या शेवटच्या पाण्याची गरज आहे. मात्र अगोदरच महावितरणच्या भारनियमानामुळे पाणी असून शेतीचे भरणे करणे अवघड झालेले असताना आता तर महावितरण कंपनीने थकीत वीज बिलाची वसुली सुरू केली आहे. यासाठी शेतकर्‍यांच्या शेती पंपाची वीज रोहित्र बंद केली जात आहेत. तालुक्यातील वांगी, खिर्डी, गुजरवाडी, कारेगाव, भेर्डापूर, बेलापूर, गोखलेवाडी यासह अनेक भागातील वीज रोहित्र बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

दरम्यान, सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्व बाजारपेठा, कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी काढलेल्या गहू, कांदा, हरभरा या पिकांची विक्री करणे देखील मुश्किल झालेले आहे. त्यामुळे शेतकर्‍याला मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशातच महावितरणने वीज बिल भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित अशी राबविलेली मोहीम शेतकर्‍यांवर अन्यायकारक ठरत आहे. शेतकर्‍यांनी कमीत कमी प्रती एचपी 1000 याप्रमाणे 3 एचपी साठी 3 हजार रुपये, 5 एचपीसाठी 5 हजार, 7.5 एचपीसाठी 7 हजार 500 रुपये, 10 एचपीसाठी 10 हजार रुपये याप्रमाणे वसुली सुरू आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान नको म्हणून संबंधित रोहित्रावरील शेतकर्‍यांनी वीज बिल भरण्यासाठी सावरकारांकडून उसनवारी केली आहे. त्यामुळे वाढीव व्याजातून येथेही शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार आहेत. चालू वर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात रब्बीतील पिके घेतली आहेत. मोठा खर्च करून हातातोंडाशी आलेली पिके पाणी असूनही वीज नसल्याने जळून चालली आहेत. त्यामुळे महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी सुरू केलेली मोहीम थांबवावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

वीज कनेक्शन कट करण्याचे आदेशच नाही
तालुक्यातील कुठल्याही भागातील शेतकर्‍यांचा शेती पंपाचा वीजपुरवठा थकीत वीज बिलासाठी खंडित करण्यात आलेला नाही. मात्र थकबाकी भरण्यासाठी फक्त आवाहन करण्यात आले आहे. शेती पंपाचे वीज कनेक्शन बंद करण्याबाबत शासनाकडून आदेश नाहीत.
श्री. कांबळे, महावितरण, उप कार्यकारी अभियंता.

तोंडी आदेशावरच वसुली सुरू…
शेती पंपाचा वीजपुरवठा थकबाकीच्या कारणावरून कट करता येणार नाही. जर थकबाकी पाहिजे असेल, तर पंधरा दिवस अगोदर संबंधित शेतकर्‍यांना नोटीस देणे बंधनकारक आहे. असा हायकोर्टाचा निकाल आहे. मात्र सध्या महावितरणच्या अधिकार्‍यांनी फक्त वरिष्ठांच्या तोंडी आदेशावरुनच वसुली मोहीम सुरू केली आहे.
– बाळासाहेब पटारे, अध्यक्ष, शेतकरी संघटना पश्‍चिम महाराष्ट्र.

Deshdoot
www.deshdoot.com