‘एमपीएससी’चा कारभार सहापैकी दोन सदस्यांच्या हाती; उर्वरित सदस्यांची नेमणूक करण्याची मागणी

‘एमपीएससी’चा कारभार सहापैकी दोन सदस्यांच्या हाती; उर्वरित सदस्यांची नेमणूक करण्याची मागणी

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अर्थात एमपीएससी कारभार सहापैकी केवळ दोन सदस्यांवर सुरू असल्याने, ‘एमपीएससी’कडून होणार्‍या पदभरतीच्या परीक्षांचा निकाल वेळेवर लागत नसल्याची तक्रार स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्य सरकारने तातडीने उर्वरित सदस्यांची नियुक्ती करून, प्रशासनाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी पावल उचलावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्य लोकसेवा आयोगाचा कारभार एकूण सहा सदस्य पाहतात. त्यापैकी प्रशासनात सध्या एक अध्यक्ष आणि सदस्य कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून चार सदस्यांची पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत एक अध्यक्ष व एक सदस्य असे दोन जण मिळून ‘एमपीएससी’चा कारभार पाहत असल्याने, प्रशासनाचा कारभार धीम्या गतीने सुरू असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

रिक्त पदांमुळे उमेदवारांचे मोठे नुकसान होत असून, निवड प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे ‘एमपीएससी’तील रिक्त पदांच्या ठिकाणी तत्काळ सदस्यांची नेमणूक करावी, अशी मागणी ‘एमपीएससी स्टुडंटस राइटस् संघटने’तर्फे करण्यात आली आहे.‘एमपीएससी’तर्फे 2017 सालामध्ये खात्यांतर्गत झालेली पोलिस उपनिरीक्षक परीक्षा; तसेच 2018 सालच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. तर, 2019 पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेतील मैदानी चाचणी व मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत.

या सोबतच 2019 अभियांत्रिकी सेवा, 2019 वनसेवा आणि 2019 राज्यसेवा परीक्षांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू झालेली नाही. या परीक्षांद्वारे पदभरतीची प्रक्रिया संथ सुरू असल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यामुळे तात्काळ रिक्त सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अनेक महिने एमपीएससीचा कारभार हा प्रभारी अध्यक्षांच्या हाती होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मागणी केल्यानंतर पूर्ण वेळ अध्यक्षांची नेमणूक झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com