धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीस अटक; लाखोंचे मोबाईल हस्तगत
स्थानिक बातम्या

धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीस अटक; लाखोंचे मोबाईल हस्तगत

Dinesh Sonawane

इगतपुरी । प्रतिनिधी

मध्यरेल्वेच्या तपोवन एक्सप्रेस व इतर ट्रेनमध्ये घुसून प्रवाशांच्या हाताला झटका देत इगतपुरी दरम्यान मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला इगतपुरी रेल्वे पोलिसांनी शिफारतीने अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास दोन लाख रुपये किमतीचे मोबाईल ( एकूण १६ मोबाइल ) हस्तगत केले आहे.

रेल्वेने प्रवास करणारे अनेक प्रवासी इगतपुरीतील निसर्गरम्य देखावे व कसारा घाटातील धबधबे आपल्या मोबाईल कॅमेरात टिपण्यासाठी गाडीच्या दरवाजा व खिडकीतुन हातात मोबाईल धरून फोटो व चित्रीकरण करतात. अशा प्रवाशांच्या हातावर काठीने किंवा धारदार शस्त्राने फटका मारून मोबाईल चोरी करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत झाल्या असुन आज पर्यंत हजारो प्रवाशांचे मोबाईल चोरीस गेले आहेत.

मात्र बरेच प्रवाशी लांब पल्लाचा प्रवास असल्याने व गाडी जास्त वेळ थांबत नसल्याने तक्रार देत नाहीत. त्यामुळे या टोळयांचे चांगलेच फावले आहे.

याबाबत रेल्वे पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की तुषार रमेश पवार, राहणार दिंडोरीरोड नाशिक, हे तपोवन एक्सप्रेसच्या जनरल डब्यात बसून नांदेड ते मुंबई असा प्रवास करीत असताना इगतपुरी येण्याचे अगोदर बोरटेंभे पुलाजवळ सदर ट्रेन हळुवार जात असताना, अज्ञात चोरट्यांनी पवार यांच्या हाताला झटका देऊन त्यांचा मोबाईल खाली पडताच मोबाईल घेऊन अन्य अज्ञातांनी पोबारा केला.

याबाबत त्यांनी इगतपुरी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे पोलिस व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने तपास मोहीम राबविली त्यात १) राहुल रमेश साळवे, मिलिंद नगर इगतपुरी, सध्या रा. घोटी २) ललित सदाशिव मोरे रा. मिलिंद नगर, इगतपुरी. ३) विशाल दत्ता आतकरी वय वर्ष २३ राहणार बोरटेंभे, इगतपुरी, या तिन्ही आरोपीस रेल्वे पोलिसांनी अटक करून कस्टडी देण्यात आली.

त्यांच्याकडून नोकीया, सॅमसंग, ओपो, विवो, एमआय, लावा, रियलमी आदी कंपनीचे चोरीच्या गुह्यातील जवळपास १६ मोबाईल ( अंदाजे किंमत दोन लाख रुपये कींमत ) व धारदार शस्त्र हस्तगत करण्यात आले. संशयितांपैकी पैकी राहुल साळवे, वय वर्षे २० राहणार मिलींद नगर, इगतपुरी, याच्यावर घोटी पोलीस ठाणे, इगतपुरी पोलीस ठाणे व इगतपुरी रेल्वे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत.

लोहमार्ग पोलिस अधिक्षक वैभव कलूबर्मे, मनमाड रेल्वे उपअधीक्षक विलास मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली, इगतपुरी रेल्वे पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुधीर पाटील, यांच्यासह उपनिरीक्षक मुरारी गायकवाड, हेमंत घरटे, अंबादास कातोरे, दीपक निकम, दिपक निकम, सतीश खर्डे आदींनी या तपासकामी विशेष परिश्रम घेतले असून पुढील तपास करत आहे.

प्रवाशांनी रेल्वेतुन प्रवास करतांना दाराजवळ ऊभे राहुन कींवा खिडकीतुन हातात मोबाईल घेऊन फोटो अथवा शुटींग करू नये.

– सुधीर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस ठाणे

Deshdoot
www.deshdoot.com