सेवा हमी कायद्याचे पालन झाले नाही तर याद राखा; राज्यमंत्री बच्चू कडूंचा दणका
स्थानिक बातम्या

सेवा हमी कायद्याचे पालन झाले नाही तर याद राखा; राज्यमंत्री बच्चू कडूंचा दणका

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पहिल्याच दिवशी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

अमरावती : अचलपूर विधानसभेचे आमदार बच्चू कडू यांनी नुकतीच राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात ते गेले होते. अचानक त्यांनी दर्यापूर येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी सर्वत्र धावपळ उडाली असताना कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे प्रस्ताव त्यांनी तयार केले आहेत.

आमदार कडू यांच्या पहिल्याच दौऱ्यात प्रशासकीय  हलगर्जीपणाचा समाचार घेतला गेल्यानंतर अमरावतीसह राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

अधिक माहिती अशी की, आज आमदार कडू यांनी दुपारी तीनच्या सुमारास दर्यापूर तहसीलला भेट दिली. अचानक राज्यमंत्री तहसील कार्यालयात आढावा घेण्यासाठी पोहोचल्याने यावेळी मोठी प्रशासकीय धावपळ उडाली होती.

कडू यांनी या आढावा बैठकीत रखडलेल्या कामांची माहिती जाणून घेतली.  या बैठकीदरम्यान संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभाग या दोन विषयांवर एक तास बैठक चालली.

त्यानंतर काही लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजना, पुरवठा विभागात संदर्भात वारंवार चकरा मारूनही आमचे काम झाले नाही अशी तक्रार संबंधित नागरिकांनी राज्य मंत्र्यांकडे केली.

संजय गांधी निराधार योजनेतील दोन अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश त्यांनी तहसीलदारांना दिले. या प्रकरणानंतर कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यातील प्रशासकीय अधिकारयांना सेवा हमी कायद्याचे पालन करावे लागेल.

जे कुणी अधिकारी सेवा हमी कायद्याचे पालन करणार नाही त्यांना बच्चू कडू यांच्याशी सामना करावा लागेल असेही कडू यांनी ठणकावून सांगितले.

बच्चू कडू यांच्या पहिल्यात मतदार संघातील दौऱ्यात झालेल्या धडक कारवाईनंतर अमरावतीसह राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धसका घेतला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com