Friday, April 26, 2024
HomeनाशिकVideo : माझ्या नाशिकला मिस करतोय गाणे ‘हिट’; अवघ्या चार दिवसांत नवेकोरे...

Video : माझ्या नाशिकला मिस करतोय गाणे ‘हिट’; अवघ्या चार दिवसांत नवेकोरे गाणे नाशिककरांच्या भेटीला

नाशिक । प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककर घरांमध्ये लॉकडाऊन आहेत. एवढी स्मशानशांतता पहिल्यांदाच नाशिकने अनुभवली. या सव्वादोन महिन्याच्या काळात नाशिककरांनी अनेक गोष्टी मिस केल्या. या गोष्टींची आठवण करुन देणारे एक गाणे प्रचंड व्हायरल होत आहे. हजारो नाशिककरांनी खाद्यसंस्कृतीसह दररोज फेरफटका मारावयाच्या काही गोष्टी मिस केल्या आहेत. मित्रांना मिस केलेय. चुलीवरची मिसळ, पाणीपुरी, कटींचा चहा, जिलेबी आणि साबुदाणा वडा खर्‍या अर्थाने नाशिकरांनी मिस केला असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन नंतर घरात बोर झालेल्या नाशिककरांनी वेगवगळ्या सोशल मीडियाच्या ट्रेंडस्मध्ये सहभाग घेत मित्रांसोबतचे जुने फोटो सोशल मीडिया पोस्ट केले होते. यानंतर रेडिओ मिरचीचा आर जे भुषण याने या सर्व परिस्थितीचे वर्णन करणारी एक कवीता रचली होती. ही कवीता सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली या कवीतेच्या पोस्टमध्ये हजारो नाशिककर व्यक्त झालेले दिसून आले.

अनेकांनी वेगवेगळे संदर्भ देत नाशिकप्रती आदरभावना व्यक्त केली. नाशिकला ते कसे मिस करत आहेत? याबाबच्या आठवणी तिथे शेअर झाल्या. दरम्यानच्या काळात रेडिओ मिरची शी बोलून भुषणने या सर्व परिस्थितीवर एक गाणेच तयार करण्याचे ठरवले.

नाशिकमधील प्रख्यात बासरीवादक मोहन उपासनी यांंना गाण्याचे कंपोझिशन ऐकवले. यात उपासनी यांनीही त्यांचे वेगवेगळे अनुभव समाविष्ट करत पॉलिश दिली. किबोर्डवादक इश्वरी दसककर आणि गिटारवादक नरेंद्र पुल्ली यांचीही साथ मिळाली.

व्हिडीओ डायरेक्शन रवी रेखा शामराव जन्नावर यांनी केले. स्क्रीन प्ले पुष्कराज जोशी यांनी लिहिला तर सिनेमेटोग्राफरची जबाबदारी निखिल पंडीत यांनी सांभाळली. व्हिडीओ एडीटिंग नागेश मिश्रा यांनी केले तर हे संपुर्ण गाणे प्रशांत पंचभाई यांच्या श्रीरंग स्टुडिओमध्ये शुट करण्यात आले.

गाण्यात नाशिकच्या काही कलाकारांना सहभागी करून घेण्यात आले. त्यांच्या माध्यमातून कॉलेज रोड, चहा, गंगा, बुधाची जीलेबी परिसर दाखविण्यात आला. हे कलाकार याठिकाणी रस्ते ओस असताना नाशिकला मिस करताना दिसतायेत. यामध्ये चिन्मय खेडकर, धनश्री आंबेकर मटकरी, किर्ती तांदळे, अथर्व लाखलगांवकर, विशाल लेंभे व प्रसाद गर्भे यांच्यासह नाशिकच्या कलाकांरानी यात सहभाग घेतला.

विशेष म्हणजे या गाण्याचे शुटींग दोन दिवसांत आटोपले तर बँडशुटींगमध्ये एक संपुर्ण दिवस लागला. तिसर्‍या आणि चौथ्या दिवशी एडीटींग संपवून नाशिककरांच्या भावना खर्‍या अर्थाने यातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्हाला आमचे जुने नाशिक पुन्हा हवंय, सकाळी मिस्सळ, दुपारी दाबेली तर संध्याकाळी पाणीपुरीचा पुन्हा एकदा आस्वाद आणि आनंद घ्यावयाचा आहे, सलीमच्या टपरीवर जाऊन कटींग चहापण घ्यावयाचा आहे.

मित्रांना कट्टावर जमायचे आहे, एकत्र पुन्हा एकदा राहावयाचे आहे, बागडायचे आहे. तरी हे संकट लवकर दूर करुन पुन्हा एकदा ‘माझं नाशिक’ मला जसं होतं तसंच हवंय, अशी आर्त हाकच या गाण्यातून देण्यात आल्याचे दिसून येत आहे. या गाण्यासाठी श्री अथर्व पार्क यांचे विशेष सहकार्य लाभले.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिककर घरात आहेत. अनेकांना नैराश्य आले आहे, मानसिक ताण-तणाव वाढला आहे. मित्रांच्यासोबत भेटणं झालेलं नाही, सगळं काही नकारात्मक आहे. या पार्श्वभूमीवर निगेटीव्हिटी दूर व्हावी सध्या जे काही चाललं आहे, ते संपावं आणि पुन्हा एकदा नाशिककरांना जुनं नाशिक परत मिळावं या हेतूनं आधी कवीता आणि तिचे रुपांतर नंतर गाण्यात करण्याचे मनात आले. अवघ्या चार दिवसांत हे गाणं साकारले आहे. तर अवघ्या आठ तासांत तीस हजार पेक्षा अधिक नाशिककरांनी हे गाणं पाहून असंख्य कमेंटस् आणि शेअर्सच्या माध्यमातून दाद दिली.

मिरची आरजे भुषण मटकरी, गाण्याची संकल्पणा आणि म्युझिक कंम्पोझिशन

- Advertisment -

ताज्या बातम्या