Photo Gallery : नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या शाळेत रंगला ‘मराठी राजभाषा दिन’
स्थानिक बातम्या

Photo Gallery : नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या शाळेत रंगला ‘मराठी राजभाषा दिन’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

आपल्याला हवे तसे घडा – दुसऱ्याला हवे तसे घडण्याचा प्रयत्न करू नका – प्रसिद्ध साहित्यिक कमलाकर देसले

नाशिक | प्रतिनिधी

प्रत्येक व्यक्तीला आपल्याला जसे हवे आहे तसे घडण्याचा प्रयत्न करा दुसऱ्याला हवे तसे घडू नका असे मत साहित्यिक कमलाकर देसले यांनी मांडले. ते नाशिक शिक्षण प्रसारक मंडळच्या जु.स. रुंगटा हायस्कूल व पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयच्या वतीने आयोजित मराठी राजभाषा दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

या कार्याक्रमचे आयोजन शाळेच्या सभागृहात सकाळी १० वाजता करण्यात आले होते. यावेळी मंचावर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अश्विनीकुमार येवला, सहसचिव प्रसाद कुलकर्णी, कवी विजयकुमार मिठे, मिलिंद कचोळे, विलास पुरकर, शाळेचे मुख्याध्यापक तथा कवी दयाराम गिलाणकर, मुख्याध्यापिका यशश्री कसरेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमप्रसंगी सुलभा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या लोकसंस्कृती या हस्तलिखिताचे व मनोजकुमार शिंपी लिखित ‘मराठी भाषा क्षमता व कौशल्य विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

कमलाकर देसले यांनी आपल्या मार्गदर्शनात असे सांगितले की प्रत्येकाला प्रश्न पडले पाहिजे. प्रश्न पडणे हे प्रतिभेचे लक्षण आहे. प्रत्येकाने स्वतंत्र असा विचार केला पाहिजे. त्या विचारापुढे ‘सु’ लावल्यास तो सुविचार झाला पाहिजे.

तेव्हाच खऱ्या अर्थाने सुसंस्कृत पिढी निर्माण होईल. मिठामुळे जेवणाला चव येते तसे कलेने जीवनाला अर्थ प्राप्त होतो. आपले व्यक्तिमत्व कोणाच्या हातात आहे त्यावर आपले व्यक्तिमत्व घडत असते. जर आपले व्यक्तिमत्व कलाकाराच्या हातात असेल तर ते उत्तम घडते. आपल्या जीवनाचा खरा कलाकार हा शिक्षकच असतो तोच आपल्या जीवनाला आकार प्राप्त करतो असेही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सकाळी शहरातून ग्रंथ दिंडी व शोभायात्रा काढण्यात आली. या मध्ये जु.स.रुंगटा हायस्कूल व पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालायचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी साहित्यिकांची वेशभूषा केलेली होती. विद्यार्थिनींनी लेझीम व बॅंड पथकाचे उत्तम सादरीकरण केले. दिंडीत विद्यार्थ्यांनी विविध साहित्यिकांचे प्रतिमा प्रदर्शित केल्या. विद्यार्थ्यांच्या मराठी घोषवाक्यांनी परिसर दुमदुमला.

मराठी दिनाचा उत्तरार्ध काव्य मैफिलीने संपन्न झाला. यावेळी सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक व कवी विजयकुमार मिठे, रवींद्र मालुंजकर राजेंद्र उगले, अरुण इंगळे, राजेश्वर शेळके, दयाराम गिलाणकर यांनी आपल्या कविता सादर केल्या. यात सादर केलेल्या कवितांनी सर्व श्रोत्यांची भरभरून दाद मिळविली.

कार्याक्रमचे प्रास्ताविक पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यशश्री कसरेकर यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती जोशी व वृषाली भट यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यक्रम प्रमुख राजेंद्र गायवन यांनी करून दिला. कार्यक्रमच्या सुरुवातीला मुकुंद बागुल व गीतमंचाने ईशस्तवन तसेच कुसुमाग्रजांचे गर्जा जयजयकार हे काव्य सादर करून प्रमुख पाहुण्यांची दाद मिळविली. आभार स्मिता पाठक यांनी मानले.

Deshdoot
www.deshdoot.com