‘हंडाभर चांदण्यां’च्या साक्षीने हंप्राठात मराठी भाषा गौरव दिन
स्थानिक बातम्या

‘हंडाभर चांदण्यां’च्या साक्षीने हंप्राठात मराठी भाषा गौरव दिन

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक :- दत्ता पाटील लिखित ‘हंडाभर चांदण्या’च्या साक्षीने हंप्राठा कला आणि रायक्ष विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा दिन साजरा करुन कविवर्य कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांना गुरुवारी अभिवादन करण्यात आले.

महाविद्यालयातील कुसुमाग्रज सभागृहासमोरील प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाचे लेखक दत्ता पाटील जातीने उपस्थित होते.

माळवाडीतील पाणीटंचाई ही काही एका गावाची समस्या नाही तर ती सार्वत्रिक असल्याने गावात पाण्याचा टँकर आलाच पाहिजे, ही भूमिका नाटकात मांडण्यात आल्याचे पाटील यांनी मनोगतात सांगितले. प्रत्येकाची जगण्याची एक गोष्ट असते. ती गोष्ट आपण स्वतःला सतत सांगत राहिली पाहिजे, त्यातूनच आपण घडत जातो. आपण ती गोष्ट शोधली नाही तर जीवन रुक्ष होते म्हणून प्रत्येकाने आपली जगण्याची एक गोष्ट तयार करण्याचा सल्ला पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी मातृभाषेतून संवाद साधण्यावर आणि शिक्षण घेण्यावर भर दिला. मराठी भाषेची तरुणांकडून होत असलेल्या मोडतोडीस समाजमाध्यमे आणि माध्यमे जबाबदार असल्याचे निरीक्षण उपप्राचार्या डॉ. वृन्दा भार्गवे यांनी नोंदविले.

प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांचे कौतुक करत दत्ता पाटील यांच्या साहित्य निर्मितीचा गौरव केला. कविवर्य कुसुमाग्रज या महाविद्यालयात शिकलेले असल्याने त्यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो, ही महाविद्यालयासाठी भूषणावह गोष्ट असल्याचे प्रा. सूर्यवंशी यांनी आवर्जून नमूद केले.

मराठी विभाग प्रमुख प्रा. के. एम. लोखंडे यांनी मराठी भाषा गौरव  दिनाची पार्श्वभूमी विशद केली. कार्यक्रमाची सुरुवात ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या अभिमान गीताने झाली. सृष्टी जोशी हिने ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ तर भाग्यश्री दलाल हिने ‘प्रेम’ या कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. संज्योत सोनजे हिने मराठी विरामचिन्ह गीत सादर केले.

प्रा. डॉ. सायली आचार्य यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मराठी भाषेविषयी लिहिलेल्या ‘खंत’पत्राचे वाचन गीत मोरे याने करुन श्रोत्यांचे लक्ष वेधले. पाहुण्यांचा परिचय प्राजक्ता नागपुरे हिने केला. आभारप्रदर्शन गौरी मोरे हिने केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी भालेराव व स्वरांगी लोकरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता प्रणाली शंकपाळ आणि दर्शन वानखेडे यांनी आगळ्यावेगळ्या पसायदानाने झाली. कार्यक्रमाला विद्यार्थी विकास अधिकारी  प्रशांत देशपांडे, नॅक समन्वयक डॉ.विवेक बोबडे, प्रा.प्रशांत आहिरे, डॉ.चंद्रशेखर घुगे, डॉ.जास्वंती मोजाड, प्रा.मनीषा डोंगरे, प्रा.गायत्री सोनवणे आदींसह सर्व विभागांचे विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com