मालेगाव, येवल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा सर्वाधिक बहुमान; हिरे व भुजबळांचा दबदबा
स्थानिक बातम्या

मालेगाव, येवल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा सर्वाधिक बहुमान; हिरे व भुजबळांचा दबदबा

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक ।  कुंदन राजपूत

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात नाशिक जिल्ह्यातून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. जिल्ह्याच्या इतिहासात डोकावले, तर हिरे परिवाराच्या माध्यमातून आताचा मालेगाव बाह्य व पूर्वीच्या दाभाडी मतदारसंघाला सर्वाधिक काळ लाल दिवा लाभला, तर भुजबळांमुळे येवल्याला उपमुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला. दुसरीकडे मात्र, जिल्ह्यातील 15 पैकी सात मतदारसंघ मंत्रिपदापासून आजपर्यंत वंचित राहिले आहे.

महाविकास आघाडीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येकी 15 तर काँग्रेसला 12 या फॉर्म्युलानुसार मंत्रीपदाचे वाटप झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पुढील काळात मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यात प्रादेशिक समतोल राखण्याचे आव्हान या तिन्ही पक्षांसमोर राहील. सत्ता युतीची असो की आघाडीची नाशिक जिल्ह्याने स्वत:चे वेगळे अस्तित्व कायम राखले आहे. भाऊसाहेब हिरे यांच्यारुपाने जिल्ह्याला सर्वप्रथम कॅबिनेट मंत्रीपद लाभले.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात हिरे महसूल मंत्री होते. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देखील त्यांचे नाव आघाडीवर असायचे. त्यानंतर सन 2004 पर्यंत मंत्रिमंडळात हिरे परिवाराचा दबदबा पहायला मिळाला. व्यंकटराव, पुष्पाताई यांनी कॅबिनेट तर बळीराम हिरे व प्रशांतदादा यांनी राज्यमंत्रीपद भूषविले. त्यानंतर मात्र, हिरे परिवाराला राजकारणात उतरती कळा लागली व त्यांची सद्दी शिवसेनेचे दादा भुसे यांनी संपवली.

त्यानंतर जिल्ह्याचा विचार करता मंत्रिमंडळात येवल्याचा सर्वाधिक बोलबाला पहायला मिळाला. आघाडी सरकारच्या 15 वर्षे सत्तेच्या काळात छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री, गृह, सार्वजनिक बांधकाम व पर्यटन खात्यांची धुरा सांभाळली. मालेगाव व येवला या दोन मतदारसंघांना सर्वाधिककाळ मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले.मात्र, जिल्ह्यातील सात मतदारसंघ मंत्रिपदाच्या बाबतीत उपेक्षितच ठरले. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, दिंडोरी, नांदगाव, बागलाण, त्र्यंबकेश्वर – इगतपुरी, चांदवड-देवळा या मतदारसंघांना कॅबिनेट दूरच साधे राज्यमंत्रीपदही पदरात पडले नाही.

मतदारसंघ – कॅबिनेट मंत्रीपद
मालेगाव बाह्य – भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे
मालेगाव – निहाल अहमद
नाशिक मध्य – डॉ.दौलतराव आहेर
देवळाली – बबनराव घोलप
येवला – छगन भुजबळ

मतदारसंघ-राज्यमंत्री पद
निफाड – विनायकदादा पाटील
कळवण सुरगाणा – ए.टी.पवार
सिन्नर – तुकाराम दिघोळे
मालेगाव बाह्य – बळीराम हिरे, प्रशांतदादा हिरे
नाशिक मध्य – डॉ.शोभा बच्छाव
मालेगाव बाह्य – दादा भुसे

Deshdoot
www.deshdoot.com