मालेगावात करोनाबाधितांची शंभरी पार; आज पाच नवीन बाधित आढळले; जिल्ह्यातील आकडेवारी ११५ वर

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. काल (दि.२२) ९७ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले होते यामध्ये सर्व अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे मालेगावकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, आज सकाळी पुन्हा नव्याने पाच रुग्ण बाधित सिद्ध झाल्यामुळे मालेगावमध्ये रुग्णांची शंभरी पार झाली आहे. आतापर्यंत मालेगावमध्ये १०१ रुग्ण बाधित असून यामध्ये दहा बाधित रुग्ण दगावले आहेत तर काल मालेगाव येथे दोन संशयितांचा मृत्यू झाला असून त्यांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत.

आज सकाळी दहा वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांचा आकडा ११५ वर पोहोचला आहे. यामध्ये मालेगाव शहरात १०१, नाशिक शहरात १०, नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यात ०४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये एक निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथील पहिला कोरोना बाधित रुग्ण करोना मुक्त झाला आहे. तर नाशिक शहरातील गोविंद नगर परिसरातील रुग्ण करोनामुक्त झाला आहे.

मालेगाव शहरात आतापर्यंत दहा रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मालेगावमध्ये सुरुवातीला जे अटकाव क्षेत्र होते त्याच्या बाहेरील रुग्ण मालेगावात आढळून आल्यामुळे अटकाव क्षेत्रांची संख्या वाढविली आहे. मालेगावातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *