धक्कादायक : आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीतच महापालिका आयुक्त, सहआयुक्त निघाले करोना ‘पाॅझिटिव्ह’
स्थानिक बातम्या

धक्कादायक : आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीतच महापालिका आयुक्त, सहआयुक्त निघाले करोना ‘पाॅझिटिव्ह’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगाव शहरात करोनाने थैमान घातले आहे. मालेगावमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे आज मालेगावी दाखल झाले होते. याच वेळी महापालिका आयुक्त व स्वच्छता सहआयुक्तांची करोनाची टेस्ट पाॅझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली आहे.  बैठक सुरु असताना दोन्ही अधिकारी बैठकीतून निघून गेले. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासह, आयुक्त तसेच पोलीस प्रशासन वरिष्ठ अधिकारी याठिकाणी उपस्थित होते.

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत आढावा बैठक सुरु असताना हा प्रकार घडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. बैठकीत आरोग्यमंत्री टोपे शहरातील करोना संक्रमणाचा आढावा घेत होते. याच वेळी आयुक्तांकडून टोपे यांना मालेगावमधील परिस्थिती सांगितली जात होती. दरम्यान, आयुक्तांना अचानक त्यांची करोना टेस्ट बाधित सिद्ध झाल्याचे समजले.

याच वेळी त्यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता बैठकीतून काढता पाय घेतला. यासोबतच सहआयुक्त यांचादेखील अहवाल बाधित आढळून आल्यामुळे त्यांनीही बैठक सोडली.  यावेळी बैठकीला आरोग्य मंत्र्यांसमवेतच, कृषी मंत्री दादा भुसे , लोकप्रतिनिधी व  विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.

काल मालेगाव मधून १५५ रुग्ण करोना मुक्त झाल्यानंतर दिलासा मिळालेला असतानाच आज याठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच ज्यांच्यावर करोना रोखण्याची मदार आहे त्यांनाच  करोनाची बाधा झाल्यामुळे मालेगावात चिंता अधिकच वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयुक्त कासार यांना नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे समजते.

सविस्तर वृत्त लवकरच…

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com